गोंदिया जिल्ह्यात १७ तलावांवर आज पक्षी गणना

0
10

गोंदिया : जंगल व नैसर्गिक वन संपत्तीने नटलेल्या जिल्ह्यात देशीच काय, विदेशी पक्ष्यांचेही बस्तान आहे. मात्र या पक्ष्यांची वन विभागाकडे अधिकृत नोंद नसल्याने २१ डिसेंबर व ११ जानेवारी रोजी जिल्ह्यातील १७ तलावांवर वनविभागाकडून पक्षी गणना केली जाणार आहे. प्रधान मुख्य वन संरक्षक, वन्य जीव महाराष्ट्र राज्य यांचे तसे आदेश आले आहे. त्यानुसार वन विभागाला आता दरवर्षी अधिकृत पक्षी गणना करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील नवेगावबांधसह अन्य काही तलावांवर देशी व विदेशी अशा ७५ प्रजातीच्या पक्ष्यांचा वावर राहतो. जिल्ह्यात येणाऱ्या या पक्ष्यांची नोंद यापूर्वी काही पशु व पक्षीप्रेमी संघटनांकडून गणना करून केली जात होती. मात्र त्यात वन विभागाचे काहीच घेणे-देणे राहत नव्हते. मात्र विदेशी पक्ष्यांचे जिल्ह्यातील आगमन त्यात होत असलेली वाढ किंवा घट ही बाब आता वन विभागाने गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच राज्य वन्य जीव विभागाचे प्रधान मुख्य वन संरक्षकांनी अवघ्या राज्यात पक्षी गणना करण्याचे आदेश काढले आहेत. त्यांच्या या आदेशानुसार आता वन विभागाला दरवर्षी पक्षी गणना करणे बंधनकारक झाले आहे.

रविवारी (दि.२१) व येत्या ११ जानेवारी रोजी या दोन टप्यात ही पक्षी गणना केली जाणार आहे. यासाठी काही सामाजीक व पशु-पक्षीपे्रमी संघटनांची मदत घेतली जाणार आहे. जिल्ह्यात यासाठी १७ तलावांची निवड करण्यात आली आहे. या तलावांवर सकाळी ६ ते ११ वाजता दरम्यान पक्षी गणना केली जाणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पक्षी व त्याच्या हालचाली टिपला याव्या यासाठी वन विभागाने पक्षीतज्ज्ञ व प्रेमींसाठी तलावाशेजारी पुरेपूर व्यवस्था करून ठेवली आहे. तसेच कॅमेरे व दूरबीन सुद्धा त्यांना पुरविली जाणार आहे.

पक्षी गणना करण्यासाठी वन विभागातील कर्मचाऱ्यांसह येथील सावन बहेकार, भरत जसानी, रूपेश निंबार्ते, शैलेश ठाकूर, अशोक पडोळे, आशिष वर्मा, रितेश अग्रवाल, जलाराम बुधेवार, अंकीत ठाकूर, महेंद्र राऊत, राजू खोडेचा, मुकूंद धुर्वे, दुष्यंत रेभे, अंकूर काळी, त्र्यंबक जरोदे, संजय आकरे, शाबाद खान, शशांक लाडेकर, मुनेश गौतम आदिंची उपस्थिती राहील. या गणनेतून परिपूर्ण अहवाल तयार करून प्रधान मुख्य वन संरक्षकांना पाठविला जाणार आहे.