पुणे, – अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणा-या अभिनेता संजय दत्तला पुन्हा एकदा १४ दिवसांची सुट्टी मंजूर झाली असून आगामी एक – दोन दिवसांमध्ये कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर संजय दत्त तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.
मुंबई बाँबस्फोटादरम्यान अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्तला तुरुंगवासाची शिक्षा झाली असून सध्या तो पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तने तुरुंग प्रशासनाकडे १४ दिवसांच्या संचित रजेसाठी अर्ज केला होता. मंगळवारी कारागृह प्रशासनाने संजय दत्तला १४ दिवसांची रजा घेण्यास मंजुरी दिली. रजेसाठी संजय दत्तने कोणते कारण दिले होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगामी एक – दोन दिवसांमध्ये संजय दत्त तुरुंगातून बाहेर येणार असल्याने संजूबाबा न्यू इयर कुटुंबासोबत साजरा करु शकेल ऐवढे मात्र नक्की.
गेल्या वर्षी संजय दत्तने वारंवार सुट्टी घेतल्याने त्याच्यावर चोहोबाजूंनी टीका होत होती. यावरुन भाजपा नेत्यांनी तत्कालीन गृहमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती.आता राज्यात भाजपाची सत्ता असून गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.