‘सत्यम कॉम्प्युटर्स’ घोटाळ्याचा निकाल ९ मार्चला

0
7

हैदराबाद-देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा ठरलेल्या ‘सत्यम कॉम्प्युटर्स’प्रकरणी हैदराबादमधील विशेष न्यायालय नऊ मार्च २०१५ रोजी निकाल देणार आहे. विशेष न्यायाधीश बीव्हीएलएन चक्रवर्ती यांनी मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी याची माहिती दिली.
या खटल्याची व्याप्ती सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मला आणखी वेळ घ्यावा लागेल. निकाल देण्यापूर्वी सविस्तर अभ्यास केल्याचे समाधान मिळाले पाहिजे, असे मला वाटते. निकाल टाईप करण्यासाठी २-३ आठवडे लाग शकतात, असेही न्या. चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले.
सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने याचवर्षी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून निकाल जाहीर केला होता. आपल्या ६५ पानी आदेशात सेबीने ‘सत्यम कॉम्प्युटर्स’चा संस्थापक रामलिंग राजू याच्यासह ५ जणांना दोषी ठरवले आहे. राजूबरोबरच त्याचा भाऊ बी. रामा राजू (व्यवस्थापकीय संचालक, सत्यम), वदलमणी श्रीनिवास (माजी मुख्य वित्तीय अधिकारी), जी. रामकृष्ण (माजी उपाध्यक्ष) आणि अंतर्गत हिशेब तपासणी विभागप्रमुख व्ही.एस. प्रभाकर गुप्ता आदींवर १४ वर्षे भांडवली बाजारात कोणत्याही पद्धतीने सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे.
घोटाळा काय?
७ जानेवारी २००९ रोजी त्या वेळी देशातील चौथ्या क्रमांकाची आयटी कंपनी म्हणून नावाजलेल्या सत्यमचा संस्थापक असलेल्या रामलिंग राजू याने सेबीला ई-मेल पाठवून आपण कंपनीच्या जमा खात्यातील रकमेचा आकडा तसेच बँकांमधील ठेवींची रक्कम फुगवून सांगितल्याची कबुली दिली. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांच्या तसेच त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितार्थ कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश सरकारने दिले होते.