पेरियार यांचे स्‍त्री विषयक क्रांतीकारी विचार

0
66

(साभार क्रांतीज्योती विचारमंच)
भारतात दोन विचारधारा प्रभावीपणे काम करत आहेत. एक अशी विचारधारा जी स्‍त्री म्‍हणजेच समाजाचा अर्धा भाग असणाऱ्या महिलांना माणूस म्‍हणून मान्‍यता देण्‍यास नकार देते. तीला अधिकाधिक अज्ञानाच्‍या, अंधकाराच्‍या गर्तेत ढकलण्‍याचा प्रयत्‍न करते तर दुसरी अशी विचारधारा अस्तित्‍वात आहे ती स्‍त्रीस मान सन्‍मान देते, तीला माणूस म्‍हणून बनवण्‍यासाठी शिक्षणाची द्वारे खूले करते व मोकळा श्‍वास घेण्‍यासाठी ती स्‍वातंत्र्य बहाल करते. पहिली विचारधारा म्‍हणजेच प्रतिगामी विचारधारा ही स्‍त्रीस नरकाचे द्वार मानते व तीला अपवित्र ठरवून धर्म व वर्णव्‍यवस्‍थेतून हद्दपार करते.

विविध कालखंडामध्‍ये स्‍त्रीच्‍या सामाजिक स्थितीमध्‍ये अनेक स्‍थत्‍यंतरे झाल्‍याचे दिसून येते. सिंधू सभ्‍यतेमध्‍ये मातृसत्ताक पद्धती अस्तित्‍वात होती. पुढे बौद्ध कालखंडामध्‍ये स्‍त्रीस पुरुषाइतकाच समान दर्जा प्राप्‍त झाला पण त्‍यानंतर मनुस्‍मृतीच्‍या कालखंडामध्‍ये तीचे जीवन हे किडया मूंग्‍याप्रमाणे निकृष्‍ट दर्जाचे झाले. स्‍त्रीला माणूस म्‍हणून किमान मानवी मूल्‍ये प्रदान करणाऱ्या विचारधारेमध्‍ये अनेक महापुरुषांनी योगदान दिलेले आहे. याच परंपरेतील असेच एक महापुरुष म्हणजे मथनथई पेरियार रामासामी उच्‍च जातीमध्‍ये जन्‍म घेवून देखील समाजामधील जातीयता, विषमता, अस्‍पृश्‍यता या अनिष्‍ट रुढींच्‍याकडे त्‍यांनी विवेकाने पाहिले व या परपरांच्‍या विरोधात आवाज उठवला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्‍या गांधी-जिना आणि रानडे या भाषणामध्‍ये महापुरुष या शब्‍दाची व्‍याप्‍ती स्‍पष्‍ट केली आहे. कार्लाईल, बकल, ऑगस्‍टीन सारख्‍या विद्वानांच्‍या मताचे अवलोकन करुन महापुरुष कोणाला म्‍हणावे हे स्‍पष्‍ट केले आहे. एखादया योद्धाला किंवा एखादया इतिहासकाराला महापुरुष म्‍हणता येईल का? असे प्रश्‍न उपस्थित करत महापुरुष म्‍हणजे नेमके कोण? याचा उहापोह केला आहे. महापुरुष अशा व्‍यक्तिस म्‍हणता येईल जो सामाजिक गतीविधाने प्रभावीत होतो व समाजामध्‍ये ज्‍या अनिष्‍ट रुढी परंपरा आहेत त्‍या घालविण्‍यासाठी एखादया सफाई कामगाराप्रमाणे हातात झाडू घेऊन त्‍याची सफाई करतो, व सामाजिक स्‍वास्‍थ टिकवण्‍यासाठी प्रयत्‍न करतो, किंवा आग्रह धरतो. या निकषाचा आपण विचार केल्‍यास पेरियार हे महापुरुष आहेत. ते उच्‍च जातीमध्‍ये जन्‍मले, त्‍यांनी स्‍वतः कधीही जातीव्‍यवस्‍थेचे चटके सहन केले नाहीत किंवा त्‍यांच्‍यावर तशी वेळच आली नाही पण आपल्‍या खालच्‍या जातीच्‍या बाबतीत पाळल्‍या जाणाऱ्या अनिष्‍ट प्रथा विरोधात आवाज उठवला. दैनंदिन जीवनामध्‍ये घडणाऱ्या घटनांकडे त्‍याचे संवेदनक्षम आकर्षित झाले ते बेचैन झाले, अस्‍वस्‍थ झाले व या अनिष्‍ट प्रथांना कडाडून विरोध करु लागले. आयुष्‍यभर त्‍यांनी या अन्‍यायकारी व्‍यवस्‍थेच्‍या विरोधात प्रभावी लेखन केले व लोकांमध्‍ये जनजागृती निर्माण केली. त्‍यांचा समग्र वाङमय हे कुडाईरासू (Kudiarasu) या नावाने प्रकाशित झालेले आहे तर या Why were womens enslaved या इंग्रजी भाषांतरामध्‍ये स्‍त्रीविषयक त्‍यांचा दृष्टिकोन स्‍पष्‍ट होताना दिसतो. स्‍त्रीच्‍या अवस्‍थेस कारणीभूत असणाऱ्या समाज व्‍यवस्‍थेमध्‍ये किरकोळ थोडाफार बदल करणे, छोटया मोठया सुधारणा करणे हे त्‍यांना अपेक्षित नाही तर समाजामध्‍ये स्‍त्रीच्‍या शोषणास कारणीभूत असणाऱ्या कारणांवर त्‍यांनी अधिक प्रकाश टाकला आहे. स्‍त्री शोषणाच्‍या कारणावर प्रभावीपणे काम करण्‍याची गरज त्‍यांनी समाजापुढे स्‍पष्‍ट केली आहे. परदेशामध्‍ये अनेक स्‍त्रीमुक्‍ती चळवळी झाल्‍या पण भारतामध्‍ये पेरियारांनी सुरु केलेली स्‍त्रीमुक्‍ती चळवळ (Periyar’s feminism) ही चळवळ तीचे वेगळे अस्तित्‍व टिकवून आहे. ७५ वर्षापूर्वी निर्माण झालेली ही विचारधारा म्‍हणजे स्‍त्री स्‍वातंत्र्याचा दस्‍ताऐवज (Magna Carta of Women’s liberation) म्‍हटले गेले आहे. स्‍त्री स्‍वातंत्र्याचा पायंडा पाडणाऱ्या या समाज शास्‍त्रज्ञाने कुटूंब नियोजनाचे महत्व २० च्‍या दशकात देशासमोर ठेवले. स्‍त्रीला केवळ मुले जन्‍माला घालण्‍याचे साधन न मानता तीच्‍याकडे माणूस म्‍हणून पाहण्‍याची गरज आहे. असे मत त्‍यांनी मांडले. ज्‍याप्रमाणे एखादया यंत्रास भावना किंवा विचार करण्‍याची क्षमता नसते त्‍याच प्रमाणे स्‍त्रीला यंत्रवत न समजता तीच्‍या भावनाचा विचार झाला पाहिजे, तीच्‍यामध्‍ये विचार करण्‍याची क्षमता निर्माण झाली पाहिजे हे महत्‍वाचे मानले. पुरुष प्रधानता, शील (Chastity), पुनर्विवाह, शरीरविक्री (Prostitution) अशा स्‍त्रीच्‍या शोषणाच्‍या प्रमुख मुद्द्यांवर त्‍यांनी सर्वांगीण विचार केला. शीलाचे बंधन हे केवळ स्‍त्रीलाच का? असा खडा सवाल त्‍यांनी समाजापुढे उपस्थित केला. स्‍त्री आणि पुरुष एकत्र येण्‍यामध्‍ये केवळ स्‍त्रीलाच कलंकित मानले जावे हे त्‍यांना अजिबात मान्‍य नाही. वेश्‍या व्‍यवसाय करणारी स्‍त्रीच दोषी पण तीच्‍या बरोबर सहवास करुन आपली कामवासना शमविणारा पुरुष मात्र निर्दोष हा दूजाभाव त्‍यांना मूळीच मान्‍य नाही. अशा वेळी स्‍त्री व पुरुष हे दोघेही सारखेच दोषी आहेत असे त्‍यांचे मत. शीलाचे बंधन हे केवळ स्‍त्रीलाच हे त्‍यांना मान्‍य नाही या बंधनामुळेच स्‍त्री प्रगती करु शकत नाही किंबहुना तीच्‍या प्रगती मधला हा फार मोठा अडथळा आहे असे ते म्‍हणतात.

समाजाने धारण करण्‍यासाठी धर्मग्रंथ निर्माण झाले व त्‍यामधून सामाजिक स्‍वास्‍थ्‍य टिकवण्‍यासाठी कायदयांची निर्मिती झाली. या धर्मग्रंथावरही पेरियारांनी कडाडून टिका केलेली आहे. ते असे म्‍हणतात की धर्मग्रंथाचे लेखन किंवा कायदयाची निर्मिती ही पुरुषांनी केलेली आहे. त्‍यांनी स्‍वतःला या कायदयाच्‍या कक्षेच्‍या बाहेर ठेवलेले आहे. आपले सर्व हितसंबंध केवळ आपल्‍या स्‍वार्थाचा, आपल्‍या सुख-सोयींचा विचार केलेला आहे व स्‍त्रीला केवळ आपल्‍या स्‍वार्था पोटी थोडे स्‍वातंत्र्य दिले आहे. आपल्‍या उपभोगाच्‍या साधनांमध्‍ये स्‍त्रीची गणती केली आहे. प्रेमवात्‍सल्‍य, शोषिकता असे गूण बहाल करुन त्‍यांचा उदो उदो करुन तीला धर्माच्‍या चौकटीमध्‍ये बंदिस्‍त केले आहे व तीचे शोषण केले आहे. स्‍त्रीचे हे गूणच मूळी स्‍त्रीला मानसिक गूलामब नवण्‍यास कारणीभूत ठरतात.

समाजामध्‍ये असा समज आहे की जन्‍माच्‍या गाठी हा देव स्‍वर्गात बांधतो. त्‍यामुळे जे पदरात पडते ते पवित्र मानून साता जन्‍मासाठी त्‍याची याचना करावी. सात जन्‍म हाच जोडीदार मिळावा यासाठी व्रतवैकल्‍ये करणे हे परियारांना ढोंगीपणाचे वाटते. विवाहाबद्दल ते असे म्‍हणतात की विवाह हा एक करार आहे (social contract) यामध्‍ये दैवी असे काहीही नाही. तर प्रत्‍येकाच्‍या स्‍वार्थासाठी, सुखसोयीसाठी केला जाणारा हा करार आहे असे ते म्‍हणतात. या विवाहाच्‍या बंधणामूळे स्‍त्रीवर पतिव्रत लादले जाते. हे बंधन दैवी असल्‍यामुळे ते तीने सर्वतोपरी निभावून (कोणत्‍याही परिस्थिती) न्‍यावे असे तीच्‍यावर वारंवार बिंबवले जाते. या बंधनामूळेच स्‍त्रीला रुढी परंपराची ओझी वाहत जीवन कंटावे लागते. अपत्‍य निर्मितीची व त्‍याच्‍या संगोपनाची जबाबदारी स्‍त्रीवर व अर्थाजनाची जबाबादारी ही पुरुषावर हा नियमच समाजामध्‍ये रुढ करण्‍यात आला. ही जबाबदारीच तीच्‍या प्रगतीचा खूप मोठा अडसर आहे असे ते म्‍हणतात. ज्‍या विवाहामुळे तीला आनंद मिळू शकत नाही किंवा सहचर्याकडून सन्‍मानाची वागणूक मिळत नसेल तर हा सामाजिक करार मोडायचा अधिकार तीच्‍या ठायी असावा. म्‍हणजे घटस्‍फोटाचा अधिकार तीला असावा असे ते मानतात. त्‍याचबरोबर तीची इच्‍छा असेल तर पुन्‍हा हा करार नव्‍याने करावयाची मूभा (पुनर्विवाह) असावी असे मत पेरियार मांडताना दिसतात. जाती व्‍यवस्‍थेतून स्‍त्रीच्‍या दास्‍याला सुरुवात झाली किंवा स्‍त्री दास्‍यामुळे हे जाती व्‍यवस्‍था बळकट होते हे विश्‍लेषण बाबासाहेबांनी Caste in India या प्रबंधामध्‍ये केलेले आहे. जाती टिकवण्‍यासाठी स्‍त्री या साधानाचा उपयोग केला जातो व त्‍यातील एक भाग म्‍हणून स्‍त्रीवर वैधव्‍य लादले जाते हे आपणास ठाऊक आहेच. विधवापण या समस्‍येवर पेरियारांनी प्रकाश टाकला आहे. पतीच्‍या निधनानंतर एकतर सती जाणे किंवा अंधार कोठडीमध्‍ये खितपत पडणे एवढेच भाग्‍य विधवा स्‍त्रीचे असते. विधवांच्‍या प्रश्‍नांवर सखोल चिंतन पेरयारनी केले आहे. शेवटी पेरियार असे सांगतात की Musculanity should be destroyed for womens liberation म्‍हणजे स्‍त्रीस म्रूत करायचे असल्‍यास पुरुषप्रधातना नष्‍ट करावी असे परखड मत ते मांडतात. शेवटी ते स्त्रियांना असे निक्षून सांगतात की तूमचा उद्धार तुम्‍हास स्‍वतःच करावयाचा आहे. तुम्‍हाला या सर्व अडथळ्यांवर मात करायची असेल तर तुम्‍ही स्त्रियांनाच एकमेकींचे प्रबोधन करुन संघटित झाले पाहिजे. तुमचा उद्धार करण्‍यासाठी कोणी देव अवतार घेणार नाही. तर तुम्‍हीच तुमच्‍या उद्धाराचा मार्ग शोधून काढला पाहिजे. स्‍त्रीच्‍या मानसिकते मध्‍ये मूलभूत बदल करून तिच्‍या मध्‍ये आत्‍मसन्‍मानाची भावना निर्माण केली पाहिजे. सामाजिक परिस्थितीचे भान निर्माण करुन समाजाच्‍या उद्धाराचेही काम तीने हाती घेतले पाहिजे. हे सर्व सांगताना पेरियार असे म्‍हणतात की वरील सर्व गोष्‍टी या स्त्रियांनी स्‍वतःच्‍या बळावर करावयाच्‍या आहेत. कोणत्‍याही परिस्थितीमध्‍ये पुरुषांवर अवलंबून न राहता त्‍यांनी हे प्रयत्‍न करायचे आहेत. अशा पद्धतीचे ते स्त्रियांना मोलाचे मार्गदर्शन करतात. स्त्रियांच्‍या सामाजिक जाणिवतेवरच समाजाची प्रगती अवलंबून आहे हे स्‍पष्‍टच आहे.

पेरियार रामासामी त्यांच्या कार्याबद्दल व त्यागाबद्दल अभिवादन.

डॉ. दीपा श्रावस्‍ती
सांगली,
मो. ९४२३८६८९७२