विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत पवार

0
21

मुंबई- विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे १३वे विद्रोही साहित्य संमेलन बुलडाणा येथे जानेवारीत होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी मुंबईतील नाटककार व ज्येष्ठ पत्रकार जयंत पवार यांची निवड करण्यात आली आहे. मराठी रंगभूमीवर नव्वदोत्तर काळात उदयाला आलेल्या नाटककारांमधील जयंत पवार हे वंश, अधांतर, माझं घर, काय डेंजर वारा सुटलाय, टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन या पाच नाटकांमुळे सुपरिचित आहेत. पवार यांनी आजपर्यंत १५ एकांकिका लिहिलेल्या आहेत. कार्यसिद्धीस जाण्यास समर्थ आहे, होड्या, घुशी या त्यांच्या एकांकिकांचे शेकडो प्रयोग महाराष्ट्रभर झालेले आहेत.
पवार यांच्या कथेने मराठी साहित्यात वेगळा ठसा उमटवला आहे. १९८७पासून कथालेखन करणा-या पवार यांचा ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा कथासंग्रह प्रकाशित असून त्यास साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकावर ‘लालबाग परळ’ हा मराठी चित्रपट बनविण्यात आला. तसेच ‘चंदूच्या लग्नाची गोष्ट’ या कथेवर ‘रज्जो’ हा हिंदी चित्रपट बनवण्यात आला आहे. मराठी आणि हिंदी मालिकांसाठी पवार सध्या कथा, पटकथा व संवादलेखन करत असून बुलडाणा येथे १७ आणि १८ जानेवारी रोजी होणा-या राज्यव्यापी विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, सचिव सिद्धार्थ जगदेव यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.