‘जय सेवा’च्या गजराने कचारगड दुमदुमले

0
27

सालेकसा दि. 10 : आदिवासी समाजाचे उगमस्थान मानले जाणारे कचारगड येथे गुरूवार ९ फेबु्रवारीला कोया पुनेम महोत्सवाला सुरुवात झाली. जय सेवा, जय जंगो, जय लिंगो असा गजर सुरू असून जय सेवाच्या गजराने संपूर्ण कचारगड परिसर दुमदुमत आहे.सकाळी येथे दोन्ही दिशेकडून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून हजारोंच्या संख्येने आदिवासी भाविक दरेकसा रेल्वे स्टेशनवरुन धनेगाव आणि कचारगडकडे चालताना दिसून येत होते. कचारगड गुफेकडे जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीत आदिवासी समाज बांधवांसह इतर विविध समाजाचे हौशी पर्यटक व यात्रेचा आनंद घेणारे लोक सुद्धा मोठ्या संख्येने उत्साहाने जाताना दिसत होते.

सकाळी १० वाजता गोंडी भूमकाल (पुजारी) याने पुजेला सुरुवात केली. गोंडी संस्कृतीनुसार पुजन विधी पार पाडीत राणी दुर्गावती तसेच गोंडी धर्माचार्य स्व.मोतीरावन कंगाली यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर गोंडी धर्म प्रचारक शितल मरकाम यांनी गोंडी धर्माचा सप्तरंगी झेंडा फडकावला. त्यानंतर स्थानिक आमदार संजय पुराम यांनी गोंडवान सामाजिक झेंडा फडकावला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना रत्नदादा हिरासिंह मरकाम आणि कचारगड देवस्थानाचे संशोधक व प्रवर्तक के.बा. मररस्कोल्हे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.

यावेळी लांजी गढचे इंजि.वासुदेव शहा टेकाम, लेखीका चंद्रशेखर मोतीरावन कंगाली, छत्तीसगड येथील गोंडी इतिहासकार भरतलाल कोराम, म.प्र.चे माजी आमदार व धर्म प्रचारक मनमोहन शाह वट्टी, हरिश्चंद्र सलाम, शंकरलाल मडावी, गोपाल उईके, रमेश ताराम, मोहन सिडाम, धनलाल प्रदिते, फगनू कलामे, तुळशीराम सलामे यांच्यासह गोंडी समाजाचे अनेक मान्यवर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

कचारगडचे भूमक नवलसिंह कुमरे आणि धुरसिंह कुमरे यांच्या मार्गदर्शनात सर्व सेवादारांनी पिवळे धोतर, पांढरा कुर्ता आणि डोक्याला पिवळा फेटा बांधून महापूजेत सहभाग घेतला. यात पारी कपार लिंगो माँ काली कंकाली देवस्थान समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे, उपाध्यक्ष रमनलाल सलाम, सचिव संतोष पंधरे, कोषाध्यक्ष बारेलाल वरकडे, मनिष पुराम, रामेश्वर पंधरे, शंकुतला परते, सुरेश परते, मनोज इळपाते, चमन पंधरे, दयाराम परते, मोहन पंधरे यांनी महापूजेत सहभाग घेतला. दरम्यान प्रशासनाच्यावतीने सुद्धा या सात दिवसीय कचारगड यात्रेदरम्यान विशेष दक्षता घेतली जाते. पोलीस विभाग सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तैनात असून प्रत्येकावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. काही मोक्याच्या ठिकाणी सी.सी. टीव्ही कॅमरेसुद्धा लावण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोफत जेवन, आरोग्य सेवा इत्यादी सेवा समिती व प्रशासनाच्या माध्यमातून पुरविली जात आहे