दत्तकग्राम पाथरी गावात बेरोजगारीची समस्या

0
13

गोरेगाव : माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गोरेगाव तालुक्यातील पाथरी गावाला दत्तक घेतले आहे. तेव्हापासून या गावाचा सर्वांगीण विकास होणार, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे. मात्र सदर गावात बेरोजगारीची समस्या सध्या आवासून उभी आहे.त्यातच ज्या दिवशी कायर्क्रम घेण्यात आला त्याच दिवशी विजचोरीचे प्रकरण सुध्दा उघडकीस आले.पाथरी गावाला माडर्न बनविण्याचा संकल्प असताना बेरोजगाराचे काय अशा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

ना. पटेलांनी पाथरी गाव दत्तक घेतल्यापासून गावातील चावडीवर गावाचा विकास होणार, बगिचा तयार होणार, पाण्याची, रस्त्यांची, नाल्यांची सुविधा होणार, अशी चर्चा जोमात सुरू आहे. परंतु गावातील बेरोजगारीचे काय? अशी चर्चासुद्धा चावडीवर केली जात आहे. गावाच्या लोकसंख्येच्या आधारावर ५० टक्के तरूण-तरूणी बेरोजगार आहेत. बेरोजगारांची मोठी फौजच गावात उभी आहे. परंतु त्यांना रोजगाराची कसलीही संधी उपलब्ध होत नाही. दहावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले युवक-युवती गावात आहेत. मात्र बेरोजगारच. येथील ५० टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी कटंगी तलावात बुडीत झाल्या. त्यामुळे शेतकरी भूमिहीन झाले व त्यांच्या पाल्यांच्या नशिबी बेरोजगारीच आली. गावाच्या सौंदर्यीकरणासोबतच बेरोजगारीची समस्या मिटविणे अगत्याचे आहे.

पाथरी गावालगत कुऱ्हाडी, हिरापूर, मलपुरी, बोळूंदा, तिमेझरी येथील लोक शेती व्यवसायावर अवलंबून राहू शकत नाही. त्यांना वर्षातून सहा महिने तरी रोजगार मिळेल, अशी योजना राबविणे गरजेचे आहे. जर या परिसरात एखादा उद्योगधंदा उघडला तर बेरोजगारांच्या हातांना काम मिळू शकेल. तिरोडा क्षेत्रात अदानीचा वीज प्रकल्प, साकोलीत अशोक ले-लँड, भंडाऱ्यात सन फ्लॅग याच धर्तीवर गोरेगाव या तालुकास्थळीसुद्धा एखादा मोठा उद्योग उघडून स्थानिक लोकांना रोजगार देणे गरजेचे आहे. तरच ग्रामस्थांना जीवन जगण्यास मदत होईल. पाथरी गावाच्या विकासासह बेरोजगारांच्या हातांना काम देवून विकास घडवून आणावा, अशी मागणी होत आहे