शिवाजीनगर (साक्री) येथील महत्त्वाकांक्षी सौर उर्जा प्रकल्प

0
21

धुळे-आधुनिक मानवी जीवनात आज विजेला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वीज आवश्यक आहे. आजपर्यंत प्रामुख्याने आपण पारंपरिक पद्धतीने औष्णिक तसेच जलविद्युत निर्मिती करत आलो आहोत. कोळशापासून वीज निर्मिती करताना हळू-हळू कोळशाचे साठे कमी होत आहेत. त्याचबरोबर कोळशापासून वीज निर्मिती करताना मोठ्या प्रमाणावर प्रदूषणही होत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आता जलविद्युत प्रकल्पाकडून ही वीज निर्मितीची मोठी अपेक्षा धरता येत नाही.

विजेची दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढणारी गरज भागविण्यासाठी आता पवन ऊर्जा व सौर ऊर्जा यासारखे वीज निर्मितीचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पवन ऊर्जा व सौर ऊर्जा ही निसर्गाकडून आपल्याला मिळालेली देणगीच आहे.

राज्यातील सर्वात मोठा तालुका, अशी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याची ओळख आहे. याच भागातून आता सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला असून, पवन व सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून हा तालुका वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राला हातभार लावत आहे.

शिवाजीनगर ता. साक्री येथे एकूण 150 मेगावॅट क्षमतेच्या महत्त्वाकांक्षी सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी वेगाने झाली असून या प्रकल्पातून 125 मेगावॅट वीज निर्मिती सुरू आहे. उर्वरित 25 मेगावॅट वीज निर्मितीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. एकाच जागी उभारण्यात आलेला देशातील हा सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प असून महानिर्मितीच्या या महाकाय प्रकल्पामुळे महाराष्ट्र शासनाने आता सौरउर्जेत गरूड झेप घेतली आहे. राज्यातील विजेची वाढती गरज व ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटावर मात करण्यासाठी जगात सुरू असलेल्या प्रयत्नास अनुसरून अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने महानिर्मितीचा हा शिवाजीनगरचा प्रकल्प फार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

धुळे जिल्ह्यातच प्रकल्प का ?

जगातील सर्वात मोठ्या या प्रकल्पासाठी आवश्यक सूर्यप्रकाशाची गरज शिवाजीनगर भागातून अधिक भागविली जाते. जगात विषुववृत्तावर 32 फॅरेनहाईट क्षमतेची सूर्यकिरणे लळींग (धुळे) व शिवाजीनगर (ता.साक्री) भागात पुरेशा प्रमाणात मिळतात. यामुळे या प्रकल्पास सर्वाधिक संयुक्तिक जागा जिल्ह्यात उपलब्ध आहे.

शिवाजीनगर येथे या प्रकल्प उभारणीचे काम सुरू झाल्यानंतर या माळरान सदृश्य परिसराचा वेगाने कायापालट होताना दिसत असून परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

शिवाजीनगर महासौरऊर्जा प्रकल्पातून एकूण 150 मेगावॅट वीज निर्मिती होणार असून यापैकी 100 मेगावॅट (250 x 4) क्रिस्टलाईन फोटो व्होस्टाईक तंत्रज्ञानावर आधारित असून उर्वरित 50 मेगावॅट (25 x 2) थिन फिल्म फोटो व्होल्टाईक तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यासाठी 8 लाख 23 हजार 319 सौर मॉड्युल्स उभारण्यात आले आहेत. सदर प्रकल्पासाठी सुमारे 381 हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेली असून त्यापैकी सुमारे 325 हेक्टर जमीन वन विभागाने उपलब्ध करून दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय किर्तीच्या नासा या संशोधन संस्थेने साक्री परिसरातील सौरकिरणाचे Recliation प्रमाणासंबंधी केलेल्या अभ्यासाच्या आधारावर या परिसराची निवड महाकाय सौर प्रकल्पासाठी करण्यात आलेली आहे. एकूण सुमारे 1 हजार 642 कोटी किंमतीच्या सदर प्रकल्पाचे काम हे ई. पी. सी. तत्त्वावर देण्यात आलेले असून सदर प्रकल्पाचे संचलन व देखभाल दुरूस्तीचे काम संबंधीत कंत्राटदाराकडून पुढील दहा वर्षासाठी केले जाणार आहे. या प्रकल्पातून प्रतिवर्षी एकूण सुमारे 240 दशलक्ष युनिटस इतकी वीजनिर्मिती साध्य होणार आहे.

कोळशाचे मर्यादित साठे, जलविद्युत निर्मितीस असलेल्या भौगोलिक मर्यादा तसेच पर्यावरण संरक्षणासाठी पर्यायी व अक्षय ऊर्जा स्त्रोत विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सौरऊर्जा निर्मितीस अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतलेली आहे.

देशाला आणि जगाला सौर उर्जेशिवाय पर्याय नाही, राज्यातील विजेची मागणी लक्षात घेता सुदैवाने महाराष्ट्रात सौरऊर्जा मुबलक प्रमाणात आहे. या उर्जेचा महाराष्ट्राला विकासाबरोबरच भारनियमनमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेता येईल.

– ज्ञानेश्वर इगवे
जिल्हा माहिती अधिकारी, धुळे(साभार महान्युज)