प्रसिद्ध उद्योगपती नारायणदास सराफ यांचे निधन

0
16

गोंदिया,दि.१६- प्रसिद्ध उद्योगपती नारायणदास सराफ (वय ८०) यांचे सोमवारी पहाटे दिल्ली येथे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले.सराफ हे फेकॉर समूहाचे विद्यमान संचालक तथा तुमसर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष होते. जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध होता. ७ सप्टेंबर १९३८ रोजी जन्मलेल्या नारायणदास यांनी विविध संघटनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. १९९८ मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर खा. प्रफुल पटेल यांच्या विरोधात भंडारा लोकसभेची निवडणूक लढविली होते. मात्र, या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. तुमसर परिसरात त्यांनी विक्रमी मते मिळाली होती, हे विशेष.
राजकीय क्षेत्रापेक्षा उद्योगपती म्हणून त्यांनी दातृत्व भावनेतून सामाजिक कार्यात अधिक रस घेतला.  वडील दुर्गाप्रसाद यांच्या दानशूरतेचा व उदारवृत्तीचा वारसा नारायणदास यांनी जोपासला.तुमसर येथील श्रीराम भवन येथे आजही मुख्यालय आहे.  काही दिवसांपासून ते आजारी होते. दिल्ली येथे खासगी इस्पितळात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. त्यांचे मागे त्यांचे धाकटे बंधू रामकिसन आणि मुरलीधर यांचे वास्तव्य नागपूर येथे असून संजय व रोहित ही दोन्ही मुले त्यांचा औद्योगिक वारसा पुढे चालवीत आहेत. त्यांच्या निधनाने उद्योग जगतात एक पोकळी निर्माण झाली आहे.