मत्स्य तलाव बचाव समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

0
15

गोंदिया,दि.16 : मत्स्य तलाव बचाव समितीद्वारे १५ मे राोजी सकाळी ११ ते ५ वाजतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन केले.
आंदोलनाचे नेतृत्व एकलव्य सेनेचे अध्यक्ष व राष्ट्रीय मत्स्यजीवी सहकारी संघ नवी दिल्लीचे माजी संचालक संजय केवट यांनी केले. गेल्या अनेक वर्षापासून मत्स्य व्यवसायिकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. मागण्यांमध्ये स्थगित असलेल्या तलावांचे स्थानिक परिसरातील संस्थांनाच मत्स्य व्यवसायाकरिता कंत्राट द्यावे, तलावातील चिखलाचा उपसा करुन दोन मीटर खोलीकरण करावे, तलावाच्या जलक्षेत्रामध्ये शेतकर्‍यांनी केलेले अतिक्रमण तलावाची पुर्नमोजणी करुन हटविण्यात यावे, गेट व पाळ दुरुस्त करावी, जाळे व नौका यावर शंभर टक्के अनुदान मिळावे, मत्स्य बाजार वेगळे ठेवून दुकानाकरिता ओटे, गाळे, सफाई, पाणी, वीज व इतर सुविधा शासकीय स्तरावर द्याव्या, ६0 वर्षे वय झालेल्या सभासदांना मासीक ३ हजार रुपये पेंशन मिळावी, पाणी वापर संस्थेच्या तलाव लिलावाचे अधिकार रद्द करुन पंचायत समिती, जिल्हा परिषदेकडे द्यावे, शौचालयासाठी अनुदान द्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. दरम्यान मत्स्य तलाव बचाव समितीच्या शिष्टमंडळाने आपले निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले. यावेळी को-ऑपरेटिव्ह बँक भंडाराचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, मत्स्य तलाव बचाव समितीचे अध्यक्ष परेश दुरूगकर, जयचंद लदरे, सीटूचे जिल्हा महासचिव महेंद्र वालदे, मत्स्य तलाव बचाव समितीचे सचिव जयेंद्र बागडे, खोमेश कांबळे, जनवादी महिला समितीच्या संयोजिका चंद्रकला कुतराहे व मत्स्य तलाव बचाव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.