राजधानीत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र होणार

0
12

नवी दिल्ली : दिल्लीत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारण्याची शिफारस तत्कालीन उच्चस्तरीय समितीने करून २५ वर्षे उलटली असताना निर्णय प्रत्यक्षात उतरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ जानेवारी रोजी या केंद्राची कोनशिला बसवतील.

ल्युटेन्स दिल्लीच्या हृदयस्थानी असलेल्या जनपथवर हे केंद्र साकारले जाणार असून या महिन्याच्या अखेरीस शिलान्यास पार पाडला जाईल. यापूर्वीच्या संपुआ सरकारने २००४ मध्ये डॉ. आंबेडकर राष्ट्रीय सार्वजनिक वाचनालयासाठी जमीन वितरित केली होती, त्याच ठिकाणी ही वास्तू उभारली जाईल. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने १९९० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी अशाप्रकारचे केंद्र उभारण्याची शिफारस केली होती. या केंद्रात राष्ट्रीय सार्वजनिक वाचनालयासह अन्य सुविधा पुरविण्याची शिफारस या समितीने केली होती. आंबेडकर फाऊंडेशनची स्थापना करण्याची शिफारसही केली होती. १९९२ मध्ये सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयाच्या अखत्यारित स्वायत्त मंडळाची स्थापना होऊन संबंधित निर्णय अमलात आणला गेला होता.