जमशेदजी टाटा यांच्या स्मरणार्थ नाणे

0
11

नवी दिल्ली, दि. ५ – मेक इन इंडिया या मोहिमेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता नवी शक्कल लढवली आहे. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या नावाने मोदी सरकारने विशेष नाणे काढण्याचा निर्णय घेतला असून एखाद्या उद्योजकाच्या स्मरणार्थ नाणे काढण्याची ही पहिलीच वेळ आहे.
जमशेदजी टाटा यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून टाटा समूहाची मुहूर्तमेढ रोवली होती. भारतातील उद्योग क्षेत्राचे जनक म्हणून जमशेदजी टाटा यांना ओळखले जाते. जमशेदजी टाटा यांचा टाटा समूह सध्या हॉटेल, स्टील, हायड्रोइलेक्ट्रीक प्लान्ट, जागतिक दर्जाची शिक्षण संस्था अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरतआहे. ३ मार्च १८३९ मध्ये जमशेदजी टाटा यांचा बडोद्यातील नवसारी येथे जन्म झाला होता. उद्योग विश्वातील या दिग्गज व्यक्तीमत्त्वाला आदरांजली म्हणून केंद्र सरकारने जमशेदजी टाटा यांच्या स्मरणार्थ विशेष नाणे काढण्याचा निर्णय घेतला आहे. या नाण्यावर जमशेदजी टाटा यांचे चित्र असेल. १०० रुपये आणि ५ रुपयांचे चांदीचे नाणे काढले जाणार असून ६ जानेवारी रोजी दिल्लीत एका छोटेखानी समारंभात या नाण्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण होईल. या समारंभात उद्योजकांनाच निमंत्रण दिले जाणार आहे.
पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदी यांना गाजावाजा करत मेक इन इंडिया ही मोहीम सुरु करण्याची घोषणा केली. मात्र त्यानंतरही भारतातील उद्योजकांकडून या मोहीमेला अपेक्षीत प्रतिसाद मिळू शकला नाही. उद्योजकांचा विश्वास संपादन करण्यात मोदी अपयशी ठरल्याचे स्पष्ट होते. उद्योजकांना खूष करण्यासाठी मोदींनी जमशेदजी टाटा यांच्या स्मरणार्थ नाणे काढल्याचे चर्चा रंगली आहे.