वी दिल्ली- गेल्या ६४वर्षाचा इतिहास असलेला नियोजन आयोग मोडीत काढून त्याजागी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या ‘निती’ आयोगाच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अरविंद पांगरिया यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. या आयोगामध्ये अर्थतज्ज्ञ विवेक देबरॉय आणि माजी संरक्षण सचिव डॉ.व्ही.के.सारस्वत यांची पूर्ण वेळ सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुरेश प्रभू आणि राधा मोहनसिंह, विशेष निमंत्रीत सदस्य – नितीन गडकरी, स्मृती इराणी आणि थावरचंद गहलोत हे आयोगातील अन्य सदस्य असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात ६४ वर्षाचा इतिहास असलेला नियोजन आयोग मोडीत काढण्याची घोषणा केली होती. ही व्यवस्था कालबाह्य झाली असून त्याऐवजी सध्याच्या गरजांसाठी लवकरच नवीन संस्था त्याची जागा घेईल, असे त्यांनी सांगितले होते.
सात डिसेंबरला पंतप्रधान मोदींनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत काही जणांनी नियोजन आयोगाच्या ऐवजी दुसरी नवीन यंत्रणा तयार करण्याचा निर्णयाला सहमती दर्शवली तर काही काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी यास विरोध केला होता.
तसेच यापूर्वी नियोजन आयोगाच्या जागी उभारण्यात येणा-या नव्या संस्थेबाबत पंतप्रधानांनी लोकांना नव्या कल्पना सुचविण्यास पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. नव्या संस्थेबाबत नवीनवीन संकल्पना तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात’, असे मोदींनी ट्विटरद्वारे सांगितले होते. तसेच यासाठीची लिंकही त्यांनी ट्विटरवर पोस्ट केली होती.