गर्रा बघेडा बनले ‘आदर्श’

0
14

भंडारा,,दि.26 – गर्रा बघेडा हे तुमसर तालुक्यातील सुमारे एक हजार लोकवस्तीचे गाव. बहुतांश लोक आदिवासी. मागासलेपणा हे या गावाच्या पाचवीला पुजलेले. खा. नाना पटोले यांनी हे गाव दत्तक घेतल्यानंतर अल्पावधीतच गावाचे रुपडे पालटले आहे. भौतिक गरजांचा भुकेले असलेले हे गाव आता आदर्श गावाकडे वाटचाल करीत आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदारांना आपल्या क्षेत्रातील एक गाव दत्तक घेऊन ते आदर्श बनविण्याचे आवाहन केल्यानंतर खा. नाना पटोले यांनी गर्रा बघेडा या विकासाचा मागमूस नसलेल्या गावाची निवड केली. पूर्वी गावात जाताना रस्त्यावरून धुराडा उडत होता. आता गावात सर्वत्र सिमेंटचे पक्के रस्ते तयार झाले आहेत.
सांडपाण्यासाठी पक्क्या नाल्या बनल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी नवीन जलवाहिनीही टाकण्यात आली आहे. स्वच्छ भारतचा नारा स्वीकारून प्रत्येक घरात शौचालय बांधण्यात आले आहे आणि त्याचा वापरही सुरू आहे. वीजपुरवठा, घरकुलाचा प्रश्नही सुटला आहे. चिमुकल्यांसाठी सुसज्ज डिजिटल अंगणवाडी, विद्यार्थ्यांसाठी अडीच एकराचे खेळाचे मैदान व या मैदानासाठी सुमारे ३0 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सध्यास्थितीत मैदानाचे सपाटीकरण सुरू आहे. उन्हातान्हात एसटीची प्रतिक्षा करणार्‍या प्रवाशांसाठी नवीन बसस्टॉप तयार करण्यात आले आहे. प्रत्येक गावकर्‍याला एलपीजीचे वाटप करून त्यांना धुरमुक्त करण्यात आले आहे.
गावात भौतिक सुविधा पुरविण्यात आला असल्या तरी गावकर्‍यांच्या रोजगाराकडेही विशेष लक्ष पुरविण्यात आले आहे. तरूणांना रोजगार प्रशिक्षण, शेतकर्‍यांना शेतीविषयक प्रशिक्षण, महिलांना बचतगटाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचे कार्य दरम्यानच्या कालावधीत करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, कौशल्य विकास योजनेतून तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे तरुण आज राज्यातील विविध भागात नोकरीला लागले आहेत. गावात राजरोसपणे सुरू असलेली दारू विक्र ी आता कायमची बंद झाली आहे.
तीन वर्षांच्या काळात या गावाचे स्वरूप ९0 टक्के बदलले असले तरी गावकर्‍यांच्या मानसिकतेत फार बदल झालेला दिसत नाही. आदर्श ग्राम योजनेत अजूनही लोकांचा सहभाग वाढला नाही. शासनाने दिलेल्या निधीतून गावाचा विकास झाला मात्र तो कायम ठेवण्यासाठी लोकांनी पुढे येण्याची गरज आहे. मुळात येथेच गावकरी कमी पडत आहेत. सध्यास्थितीत यंत्रणेकडून गावाचा कायापालट होत असला तरी भविष्यात त्याचा वापर करून घेणे हे गावकर्‍यांना ठरवायचे आहे.