प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागातील सर्वात मोठ्या पुलाचे आज लोकार्पण

0
6
खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.26 – केंद्रसरकारची प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ही 100% केंद्र पुरस्कृत योजना असून राज्यात सन 2000 पासून राबविण्यात येत आहे. सदर योजनेची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाच्या आधिपत्याखालील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करण्यात येत असून या योजनेच्या भाग 2 मध्ये गोंदिया जिल्ह्यात 13 रस्ते व 1 पुलाच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती.त्यापैकी 11 रस्ते पुर्ण झाले आहेत.सोबतच सर्वात महत्वाचे असे नागपूर विभागातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत 6 कोटी 20 लक्ष रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेला वाघनदीवरील साखरीटोला-तिरखेडी मार्गावरील बुडीत पुलाचे लोकार्पण आज शुक्रवारला होत आहे.या पुलाचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार आहे.
विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम (रोहयो)विभागाव्यतिरिक्त प्रधानमंत्री ग्रामसडक योजना या विभागाने कंत्राटी अभियंत्याच्या बळावर रस्ते आणि पूलाचे चांगले काम केले आहे.नागपूर विभागांतर्गंत येत असलेल्या सहा जिल्ह्यातील सर्वात लांब 180 मीटर लांबीचा पुलाचे बांधकाम गोंदियाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागाने केले आहे.या विभागाचे उपअभियंता दिनेश कापगते यांनी सांगितले की,आमच्या विभागातंर्गत तयार करण्यात आलेला हा पुल नागपूर विभागातील सर्वात मोठा पूल आहे.त्यातही पुलाच्या बांधकामाची गुणवत्तेत कुठलाही कसर न करता कंत्राटी अभिंयंत्याच्या देखरेखीत कंत्राटदाराच्या विकासात्मक सहकार्याच्या भूमिकेतून हा पूल साकारला गेला आहे.या पुलाचे बांधकाम वाघनदीवर झाले असून गेल्या अनेक वर्षापासून साखरीटोला ते सालेकसा या मार्गाचा पावसाळाच्या दिवसात चार ते पाच महिने जो संपर्क बंद राहायचा आणि सालेकसाला जाण्यासाठी आमगाव मार्गे अधिक फेर्याने जावे लागायचे ते किमान 20 किमीचे अंतर या पुलामूळे कमी झाले आहे.180 मीटर लांब असलेल्या पुलाचे 18 गाळे हे 10 मीटरचे आहेत.या पुलाच्या बांधकामामुळे साखरीटोला व देवरी परिसरातील नागरिकांना सालेकसा मार्ग छतीसगडला जाण्यासाठी बारमाही रस्ता उपलब्ध झालेला आहे.या पुलाच्या बांधकामात अनेक अथडळे आले विशेष करुन केंद्राकडून येणारा निधी वेळेवर न आल्याने पुलाच्या बांधकामाला उशीर झाला.तो निधी मिळाल्यानंतर हा पूल मार्च महिन्यात पुर्ण होऊन आता वाहतुकीसाठी खुला होत आहे.या पुलाच्या बांधकामासाठी कार्यकारी अभियंता जे.जे.नंदनवार,उपअभियंता दिनेश कापगते,कनिष्ट अभियंता राजेश येळे यांच्या चमूने व कंत्राटदार उदय प्रमर यांनी काम केले आहे.