आठ कोटीतून उभारणार ‘इंटरप्रिटेशन सेंटर’

0
9

नवेगावबांध : /गोंदिया जिल्हा नैसर्गिक संपत्तीने नटलेला आहे. जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळे विकासाच्या प्रतीक्षेत आहेत.पर्यटनामुळे अनेक रोजगार उपलब्ध होत असतात. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील इतर विकास कामांसोबतच पर्यटनस्थळांच्या विकासाला विशेष प्राधान्य देणार, अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री राजुकमार बडोले यांनी नवेगावबांध येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
वन्यजीव विभागाचे लॉग हट येथे आयोजित आढावा बैठकीनंतर लगेच जि.प. विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली होती. पर्यटनाच्या बाबतीत नवेगावबांधमध्ये ही पहिलीच बैठक घेण्यात आली.त्यामध्ये अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आलेत. नवेगाव पर्यटन संकुल परिसरात तयार केलेले रॉक गार्डं व सभागृह सबंधीत कंत्राटदाराने ३१जानेवारी पर्यंत शासनाला हस्तांतरीत करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले नाही.
अडगळीत पडलेले हिल टॉप गार्डनचे सुशोभीकरण करण्याचे प्रामुख्याने ठरविण्यात आले.त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून सदर विकासकाम एमटीडीसीच्या माध्यमातून करता येईल.
दिवसेंदिवस येथील पक्ष्यांची संख्या घटत आहे.त्यामुळे वनविभाग व वन्यजीव विभागाने विशेष बाब म्हणून स्थानिक व स्थलांतरीत पक्षी संरक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे, नवेगाव जलाशयाच्या खोलीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेत. त्यामुळे तलावातील बेशरमची झाडे नष्ट होतील व जलाशयाची साठवणूक क्षमता वाढेल.परंतु सदर काम हे आताच होणार नाही भविष्यात होईलच असेही ते म्हणाले.
मागे एमटीडीसीने पर्यटन विकासाचे बाबतीत ४५कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार केला होता.त्यापैकी २२.५ कोटी मंजूर झाल्यापैकी आठ कोटी रुपये नवेगावबांधसाठी मिळालेले आहेत.त्यातून इंटरप्रिटेशन सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. हे काम महिनाभरात सुरू करायचे आहे.तसेच येथे एडव्हेंचर स्पोर्टस सुरू करण्याचा देखील मानस आहे.प्रतापगड देवस्थान देखील एमटीडीसीच्या प्रस्तावात आहे.झाडीपट्टी पर्यटन महोत्सव आयोजित करून पर्यटनाला चालना मिळेल. धान परिषद आयोजित करून धान उत्पादक शेतकर्‍यांना न्याय मिळेल याचाही विचार सुरू आहे.
झाशीनगर उपसा सिंचन योजनेचा १५00 हेक्टरचा टप्पा येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण होईल व २000 हेक्टरचा टप्पा त्यानंतर सुरू करण्यात येईल, असे ना.बडोले यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला ना.राजकुमार बडोले यांचेसोबत माजी आ. दयाराम कापगते, सभापती प्रकाश गहाणे, माजी सभापती उमाकांत ढेंगे, रघुनाथ लांजेवार, नामदेव कापगते व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार संदीप कापगते यांनी केले.