ओबीसींना घरकूल उपलब्ध करून द्या

0
14

सिरोंचा : येथील ओबीसी प्रवर्गातील बीपीएल लाभार्थ्यांना इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकूल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून सिरोंचाचे उपसरपंच रवी सल्लम यांनी केली आहे.
सिरोंचा ग्रामपंचायतीने ४ ते ५ वर्षांपूर्वी ग्रामसभा घेऊन सर्वच प्रवर्गाच्या घरकूल लाभार्थ्यांची यादी पंचायत समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाकडे पाठविली. यातील ओबीसी वगळता सर्वच लाभार्थ्यांना घरकूल उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र येथील ओबीसी लाभार्थी घरकूलापासून वंचित आहेत. घरकुलाअभावी गरीब नागरिकांना झोपडीमध्येच जीवन कंठावे लागत आहे. अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाच्या प्रतीक्षा यादीमध्ये नाव असल्याने आज ना उद्या घरकूल मिळेल, या आशेने नवीन घर बांधले नाही. याबद्दल घरकूल लाभार्थी पंचायत समितीमध्ये जाऊन विचारणा करीत आहेत. सदर लाभार्थ्यांना घरकुलासाठी निधीच उपलब्ध नसल्याने घरकूल मंजूर झाले नसल्याचे कारण सांगितले जात आहे.
यापूर्वीच्या शासनाने घरकूल लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून दिला नाही. मात्र भाजपा सरकारने याकडे विशेष लक्ष घालावे, अशी मागणी सल्लम यांनी केली आहे.