बहुजन भाजपा कार्यकर्त्यांचा ‘स्वयंसेवक’ बनण्यास नकार !

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

यवतमाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्र साधना संमेलनासाठी येणाऱ्या दहा हजार कार्यकर्त्यांना संघाचा ‘ड्रेस कोड’ बंधनकारक करण्यात आला आहे. या सक्तीमुळे भाजपातील बहुजन कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून ‘आता आम्ही संघाची चड्डी घालावी का?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्र साधना संमेलन ११ जानेवारी रोजी यवतमाळात होऊ घातले आहे. यवतमाळ, पुसद व वाशिम विभागाचे हे संमेलन असून दोन हजार ४०० गावातील दहा हजार स्वयंसेवकांना या संमेलनाचे निमंत्रण आहे. पथसंचलन, ध्वजारोहण, शारीरिक प्रात्यक्षिके आदी कार्यक्रम यावेळी होणार आहेत. संघाच्या या संमेलनासाठी भारतीय जनता पक्ष आणि या पक्षाच्या सर्व आघाड्यांच्या (सेल) पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी खास हाफ चड्डी, शर्ट, काळी टोपी हा गणवेश, बुट (पदवेश), काठी (दंड) हा ड्रेस कोड राहणार आहे. संघ स्वयंसेवकांसोबतच संमेलनाला येणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांनाही हा ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला आहे. हाफ चड्डीचा समावेश असलेला हा ड्रेस कोड संघ स्वयंसेवकांच्या अंगवळणी पडला असला तरी भाजपा कार्यकर्त्यांना त्याची सवय नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यांची काहीशी अडचण झाली आहे. भाजपाच्या कित्येक कार्यकर्त्यांना राष्ट्र साधना संमेलनाला जायचे आहे. मात्र संघाचा ड्रेस कोड घालण्याची त्यांची तयारी नाही. त्यातच भाजपातील बहुजन चेहरा असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये तर संघाच्या या ड्रेस कोडच्या बंधनाबाबत चांगलीच नाराजी पहायला मिळत आहे. त्यातच या कार्यकर्त्यांना ३३० रुपयांचा भुर्दंडही सहन करावा लागणार आहे.

बदल हवा म्हणून आम्ही भाजपा आणि मोदीला जवळ केले. मात्र अचानक संघाची ही ड्रेस कोडची ताकीद आणि अजेंडा आला कोठून? आता आम्ही बहुजनांनी हाफ चड्डी घालायची का? की पक्ष सोडून द्यायचा, असा प्रश्न भाजपातील बहुजन कार्यकर्त्यांच्या गोटातूनच उपस्थित केला जात आहे.