पाव शतकापासून ऐतिहासिक सिंदखेडराजा विकासाच्या प्रतीक्षेत

0
31

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांच्या जन्माने पावन झालेला सिंदखेडराजा परिसर ऐतिहासिकदृष्ट्या जागतिक दर्जाचा ठेवा आणि वारसा आहे. येथील अनमोल अशा अनेक वास्तू आणि शिल्पे यांचे संरक्षण, संवर्धन आणि विकासाची जबाबदारी शासनाची आहे. मात्र, या ना त्या कारणांनी गेल्या २५ वर्षांपासून या नगरीच्या विकासाकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष द्यायला कोणत्याही शासनाने वेळ काढला नाही.

सिंदखेडराजा हे जिजाऊंचे जन्मस्थान आहे, एवढेच या परिसराचे महत्त्व नाही; तर महाराष्ट्राच्या वैभवशाली शिवशाहीच्या इतिहासाचे हजारो पुरावे आजही सिंदखेडराजामध्ये आहेत. परंतु ते ज्या वैभवाची साक्ष देतात त्या वैभवी थाटात आज ते नसून अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत या नगरीची वाटचाल सुरू आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी जिजाऊ जन्मस्थळाच्या संरक्षणाचा व संवर्धनाचा मुद्दा पुढे आला आणि तेव्हापासून थोड्या फार प्रमाणात त्याकडे लक्ष दिले जाऊ लागले. परंतु ज्या दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हायला हवा होता तो झालेला नाही. सिंदखेडराजाची वैभवी पाश्र्‍वभूमी पाहता त्याचा विकास झाला पाहिजे, ही भूमिका सिंदखेडराजा नगरपालिकेने १९८० च्या सुमारास सर्वप्रथम मांडली.

१९८१ ला तत्कालीन आमदार (स्व.) भास्करराव शिंगणे, (स्व.) जे. के. खरात, सामाजिक कार्यकर्ते (स्व.) एन. जी. काझी, अनिल सावजी आदींनी ही भूमिका लावून धरली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी, तत्कालीन खासदार बाळकृष्ण वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. या समितीने या परिसराचा संपूर्ण अभ्यास करून व कोणकोणत्या सुविधा केल्या पाहिजेत, ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण, संवर्धनासाठी काय केले पाहिजे, असा सविस्तर अहवाल ९ जानेवारी १९८२ रोजी बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्याकडे सादर केला होता. त्या वेळी या अहवालात १०० कोटी रुपयांची कामे करावीत, असे प्रस्तावित करण्यात आले होते. हा अहवाल संपूर्णत: जसाच्या तसा स्वीकारत असल्याची घोषणा अंतुले यांनी नऊ जानेवारी १९८२ ला जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यामध्ये केली होती. या अहवालामध्ये प्रामुख्याने वस्तुसंग्रहालय, अभयारण्य, औद्योगिक वसाहत, बस स्थानक, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथालय, पाणलोटाची कामे, जिजाऊ जन्मस्थळाचा सर्वांगीण विकास आणि सिंदखेडराजा परिसरातील सर्व ऐतिहासिक स्थळांची दुरुस्ती, मजबुती, अंतर्गत रस्ते, सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण अशी कामे सुचविण्यात आली होती.

मात्र, दुर्दैवाने या प्रस्तावाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. युती शासनाच्या काळात थोड्या फार प्रमाणात राजवाडा परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात आले. इतर कोणतीही कामे झालेली नाहीत. परिणामी आज यापैकी अनेक स्थळे दुर्लक्षित आहेत. काहींची पडझड होत आहे. त्यांच्या संरक्षणाची कोणतीही जबाबदारी निश्‍चित करण्यात आलेली नाही. उच्च दर्जाची शिल्पे, कोरीव काम असलेले खांब, दगड ज्याच्या हाती सापडेल तो पळवीत आहे. नुकतीच राजवाड्यातील बहुमोल किमतीची तोफ चोरून नेल्याची घटना ताजी आहे. यावरून पुरातत्त्व विभागाला महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची किंवा या इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तूंची कसलीही काळजी नसल्याचेच दिसून येत आहे. जोपर्यंत ऐतिहासिक नगरी म्हणून या शहराच्या विकासाची भूमिका शासन घेत नाही तोवर हे असेच चालत राहणार आहे. सिंदखेडराजा हे राजे लखूजीराव जाधव यांच्या राजधानीचे शहर आहे. अनेक ऐतिहासिक संदर्भ या ठिकाणाला आहेत. महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवरायांची पावले या परिसरात सुमारे दोन वर्षे दुडदुडत होती. शिवरायांनी राज्यभर पराक्रम गाजविले त्या पराक्रमाच्या पाऊलखुणा सिंदखेडराजाच्या भूमीतच आहेत याचा विसर पडता कामा नये.

* नगरपालिकेने सुचविलेल्या विकासकामांमध्ये भव्य प्रवेशद्वार उभारणे, सिंदखेडराजा शहराचे इतिहासात असलेले स्थान व महत्त्व याची जाणीव पर्यटकांना शहरात प्रवेश करताच व्हावी, या करिता राजवाड्यासमोर भव्य प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे आणि या प्रवेशद्वारापासून ते राजवाड्यापर्यंत रस्ता, पेव्हिंग ब्लॉक, दुतर्फा नाली, डिव्हायडरच्या साहाय्याने रस्ता सुशोभित करणे.

* शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा : लखूजीरावांचा राजवाडा हे जिजाऊ मातेचे जन्मस्थान. या परिसरातील बगीच्यामध्ये पूर्व बाजूस छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळा उभाण्यात यावा; जेणेकरून हिंदवी स्वराज्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या छत्रपतींचा अश्‍वारूढ पुतळा पाहून पर्यटक व सहलीसाठी येणाऱ्या विद्याथ्र्यांचा देशाभिमान जागृत होईल.

* राजे लखूजीराव जाधव यांचा पुतळा उभारणे : देशातील कोणत्याही हिंदू राजाची समाधी राजे लखूजीराव जाधव यांच्या समाधीसारखी भव्य नाही. जर राजे लखूजीराव जाधव यांचा पुतळा सदर समाधीसमोर उभारण्यात आला तर पर्यटकांना त्यांच्याविषयीचे असलेले आकर्षण वाढण्यास मदत होईल.

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचा विकास : शहराच्या सौंदर्यीकरणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचा विकास करून उद्यान तयार करणे.

* सांस्कृतिक सभागृह : शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु या ठिकाणी सुसज्ज असे सांस्कृतिक सभागृह नसल्याने येथील कार्यक्रम उघड्यावर किंवा शाळा, महाविद्यालयांमध्ये घेतले जातात. ही अडचण दूर करण्यासाठी मोठे सांस्कृतिक सभागृह आवश्‍यक आहे.

* रंगमहालाची दुरुस्ती : राजमाता जिजाऊंचा विवाह शहाजी राजांसोबत ज्या ठिकाणी ठरला ते ऐतिहासिक ठिकाण म्हणजे रंगमहाल होय. हा रंगमहाल अत्यंत सुंदर आणि भव्य होता. मात्र सद्य:स्थितीत त्याची पडझड होत आहे. त्याच्या संरक्षणासाठी महालाची दुरुस्ती व पुनर्बांधणी करून सभोवतालचा परिसर विकसित करण्याची गरज आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीदेखील या महालाचा उपयोग होऊ शकतो.

* तलावांचे संरक्षण, सौंदर्यीकरण : सिंदखेडराजा शहराच्या सौंदर्यात भर घालणारे चांदणी तलाव व मोती तलाव हे दोन तलाव आहेत. त्यांच्या विकासाची व सौंदर्यीकरणाची आवश्‍यकता आहे. तलावांचे सौंदर्य वाढविणे व अबाधीत ठेवणे यासाठी या तलवांमध्ये येणारा पाण्याचा स्रोत वाढविण्याची गरज आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याअभावी या तलावांचे सौंदर्य नाहीसे होते. मात्र, या परिसरात पाणलोट विकासाची कामे केल्यास या तलावांत कायमस्वरूपी पाणी राहील. त्यामुळे नौकाविहारासारखे प्रयोग पर्यटकांना आकर्षित करू शकतील.

* काळाकोट सुशोभीकरण : राजवाड्यापासून ३०० मीटर अंतरावर काळाकोट आहे. तटबंदीसाठी हे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, अर्धवट काम झाल्यानंतर मोगल बादशहाने काम बंद पाडले होते. याचेदेखील संरक्षण व संवर्धन करण्याची गरज आहे. या ठिकाणी ऐतिहासिक संदर्भ ग्रंथालय किंवा वस्तुसंग्रहालय निर्माण करता येऊ शकते.

* ऐतिहासिक संदर्भ ग्रंथालय : पर्यटकांची गर्दी वाढल्यानंतर या ठिकाणी अभ्यासकदेखील येऊ लागतील. या अभ्यासकांना छत्रपतींच्या काळातील दुर्मिळ माहिती, ऐतिहासिक संदर्भ, काव्य, शिलालेख आदी सहज उपलब्ध झाले पाहिजे यासाठी संदर्भ ग्रंथालयाची गरज या ठिकाणी आहे.
या कामांशिवाय शहरात पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दर्जाची निवास व्यवस्था, पर्यटन महामंडळाचे हॉटेल, ऐतिहासिक वास्तूंना जोडणारे रस्ते व नव्याने उभ्या राहत असलेल्या जिजाऊ सृष्टीवर जाण्याची व्यवस्था आदी कामे होणे आवश्‍यक आहे.

अलीकडच्या काळात जिजाऊ जन्मस्थळाच्या विकासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी २५ ऑगस्ट २०११ ला सिंदखेडराजाच्या विकासासाठी स्वातंत्र प्राधिकरण स्थापणे आवश्‍यक असल्याच्या बाबीला दुजोरा देऊन तसा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. त्याच वेळी त्यांनी १९८२ चा १०० कोटींचा आराखडा आज सहा हजार कोटींचा झाला असेल, असे नमूद केले होते. या बैठकीला तत्कालीन पालकमंत्री मनोहरराव नाईक, माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, तोताराम कायंदे, नियोजन समिती सदस्य ऍड. नाझेर काझी, नगराध्यक्ष सीताराम चौधरी आदी उपस्थित होते. मात्र, या शासनानेदेखील कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने गेल्या २५ वर्षांपासून ही नगरी विकासाच्या प्रतीक्षेत आहे, असेच म्हणावे लागते.