बहारदार ठरली ‘ऋतुराज’ काव्य मैफिल.#ते सूर्यासाठी थांबत नाही#…..

0
10

गोंदिया,दि.१ :- येथील सुप्रसिद्ध कवी वसंतराव मातुरकर ‘ऋतुराज’ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘ऋतुराज’काव्य मैफिल रसिक श्रोत्यांसाठी अत्यंत संस्मरणीय आणि बहारदार ठरली.उल्लेखनीय असे की गोंदिया शहरातील राष्ट्रीय मंचावरील हिंदी-उर्दू भाषक कवी तथा शायर मरहुम सलीम अख्तर यांचेही स्मरण करून अभिवादन करण्यात आले.विदर्भ साहित्य संघ, शाखा गोंदियाच्या विद्यमाने बापट लान्स येथे सदर मैफिलीचे आयोजन(३०जुलै)करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी नाट्याभिनय व नृत्यकलेचे मर्मज्ञ दीपक वेरुळकर तर सूत्रसंचालक कवी माणिक गेडाम हे होते.या दोघांच्या हस्ते कविवर्य ऋतुराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मैफिलीचे उदघाटन करण्यात आले.काव्य,काव्यात्मता आणि कविता यावर भाष्य करीत माणिक गेडाम यांनी ‘ज्यांना काही करायचे असते,ते सूर्यासाठी थांबत नाही,ज्यांना वाट चालायची असते,ते रस्त्यासाठी अडत नाही’ या ऋतुराजाच्या तसेच ‘पिघलना उनका अंजाम था, वो भी क्या करते,मोम के लोग थे, सूरज को जगानेवाले’ या सलीम अख्तर यांच्या काव्यपंक्तींनी सूत्रसंचालनाला आरंभ केला आणि एकेक कवीला कविता वाचनासाठी पाचारण केले. शशी तिवारी,लक्ष्मीकांत कटरे, नंदलाल पोगडे, संजय धमोरीकर, कुमार कोकणे,चैतन्य मातुरकर, निखिलेशसिंह यादव,मिलिंद रंगारी,सौ.भैरवी देशपांडे, श्रीमती किंजल मेहता,श्रीमती स्मिता तारे, कु.सरिता सरोज आणि प्रियंका रामटेके यांनी आपल्या कविता सादर केल्या.रसिकांनी मराठी-हिंदी कवितांना मनसोक्त दाद दिली.
याप्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष दीपक वेरुळकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करून सर्व कवींचा सत्कार करण्यात आला. उदघाटन कार्यक्रमाचे संचालन सहसचिव कुमार कोकणे व शेवटी आभार प्रदर्शन चैतन्य मातुरकर यांनी केले.