पोलिसांच्या कुशल कार्यशैलीमुळे नक्षल्यांचा जनाधार ओसरला

0
15

 आत्मसमर्पित नक्षलवादी गोपीने मांडले वास्तव
 नक्षल चळवळ संपुष्ठात येण्याचीही वर्तविली शक्यता

नागपूर, दि. १६ : महाराष्ट्र शासन व पोलिस विविध उपक्रमांच्या माध्यमातून गडचिरोलीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. मागास आणि नक्षलग्रस्त भागातील आदिवासी जनतेत जाऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलिसांकडून राबविण्यात येणा-या विविध प्रयत्नांमुळे नक्षल्यांचा जनाधार ओसरत आहे. हे वास्तव मांडले आहे, पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणा-या गोपी ऊर्फ निरंगसाय मडावी याने. वैशिष्टय म्हणजे, पोलिसांच्या या कुशल कार्यशैलीमुळे अनेक नक्षलवादी आत्मसमर्पणाच्या वाटेवर असून येत्या काही वर्षात नक्षल चळवळ संपुष्ठात येण्याची दाट शक्यताही त्याने वर्तविली आहे.
आयुष्याची अनेक वर्षे नक्षल चळवळीत घालवून मोठ्या-मोठ्या हिंसक घटनांमध्ये सहभाग नोंदविलेल्या जहाल नक्षलवादी गोपीने ११ नोव्हेंबर २०१४ रोजी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर प्रथमच घेण्यात आलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.
गोपी हा मुळचा कोरची तालुक्यातील असून वयाच्या बाराव्या वर्षी घरातील अंतर्गत वादामुळे त्याने घर सोडले. नागपूरला येऊन एखादे काम करायचे मनात होते. मात्र गडचिरोलीत भेटलेल्या एका मित्रामुळे नागपूरला जाण्याचा विचार मनातून काढून टाकला. त्यानंतर त्या मित्राच्या सोबतीने सन २००२ मध्ये नक्षल चळवळीत प्रवेश केला. सुरुवातीला ३ के दलममध्ये (कोरची, खोब्रामेंढा आणि कुरखेडा) सदस्य म्हणून काम करताना गोपीने हळूहळू वरिष्ठ नक्षल्यांचा विश्वास संपादन केला. हिंसक कारवाया करण्यात अत्यंत निपुण असल्याने व दिलेली जबाबदारी न चुकता पार पाडीत असल्यामुळे त्याला दलम कमांडर म्हणून बढती देण्यात आली. एवढेच नव्हे तर तो विभागीय समितीचा सदस्य देखील झाला होता.
नक्षलवाद्यांच्या योजनेबद्दल विचारले असता तो म्हणाला, नक्षलवादी गावात आल्यावर त्यांचा गणवेष, त्यांचे नाच-गाणे पाहून आदिवासी युवक-युवती त्यांच्याकडे आकर्षित होतात. विचाराने आकर्षित होणा-यांची संख्या जवळपास शुन्यच आहे. एकदा नक्षल्यांसोबत गेले की मग ते पोलिसांची भीती दाखवितात. परत गेले तर तुम्हाला पोलिस मारून टाकतील, असे सांगण्यात येते. कोणत्या गावात जायचे याचा निर्णय दोन-तीन दिवसांपूर्वी घेण्यात येतो. जीवाच्या भीतीमुळे काही नागरिक पोलिसांबद्दल नक्षल्यांना माहिती देतात. त्यानुसार नक्षलवादी योजना आखतात. पोलिसांवर हल्ला करण्यासाठी लागणारे ब्लास्टिंगचे साहित्य वरिष्ठ कमिटीच्या सदस्यांकडून पोहचविले जाते. एकमेकांसोबत संपर्क करण्यासाठी कोडवर्डचा वापर करण्यात येतो तसेच वायरलेस यंत्रणासुध्दा सोबत असते. सध्या केंद्रीय कमिटीचा सदस्य असलेल्या मिलींद तेलतुंबडेला भेटायला पुण्याकडील काही लोक जंगलात आले होते, असा खुलासा गोपीने केला.
–२–
–२–
एवढेच नव्हे तर खंडणीचा सर्व पैसा वरिष्ठ कमिटीच्या सदस्यांकडे जातो. दलममध्ये काम करणा-यांना केवळ गरजेपुरता पैसा देण्यात येतो, असेही त्याने सांगितले. आत्मसमर्पणाचा विचार कधी आला, यावर गोपी म्हणाला, ऐवढी वर्षे काम करूनही सहका-यांकडून संशय घेण्यात येत होता. त्यातच शासनाच्या आत्मसमर्पण योजनेबद्दलसुध्दा ऐकण्यात आले होते. सन २०१० पासून चळवळ सोडून घरी परतण्याचा विचार मनात येऊ लागला होता. मात्र त्यावेळी जवळच्या विश्वासू सहका-यांनी सांगितले की, असे पाऊल उचलले तर तुला ठार मारतील. एवढेच नव्हे तर गडचिरोली ह्न गोंदिया डिव्हीजनचा डिव्हीजनल कमांडर पहाडसिंग ऊर्फ कुमारसाय कतलामी यानेसुध्दा चळवळ सोडून न जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे द्विधा मनस्थितीत असल्यामुळे बाहेर पडू शकलो नसल्याचे गोपीने यावेळी सांगितले.
संशय घेण्याच्या प्रकारामुळे गोपीचे वरिष्ठ नक्षलवाद्यांशी चांगलेच बिनसले होते. त्यामुळे गोपीवर पाळत ठेवण्यास सुरुवात झाली होती. एकेकाळचे सहकारीच त्याच्यावर संशय घेऊ लागले होते. गोपीने अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला. सहका-यांच्या जाचातून मुक्त होण्यासाठी पोलिसांपुढे आत्मसमर्पण करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही, या निर्णयावर गोपी आला. राज्य शासनाच्या आत्मसमर्पण योजनेबद्दलसुध्दा त्याला माहिती होती. त्याची ही मानसिकता ओळखून पोलिसांनी एका मध्यस्थामार्फत गोपीवर दबाव वाढविला. अखेर यात पोलिसांना यश आले. गोपीने ११ नोव्हेंबर २०१४ रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
गरीब आदिवासींची व्यापारी, ठेकेदार यांच्याकडून लुट थांबविण्यासाठी नक्षल चळवळ सुरू झाली होती. मात्र कालांतराने या चळवळीचे रूप बदलले आहे. निरपराध नागरिकांच्या हत्या आणि उद्योगपतींकडून खंडणी वसूल करण्यावरच त्यांचा आता भर आहे. ही बाब येथील आदिवासींच्याही लक्षात आली असून त्यांना शासनाचा विकास हवा आहे. गत पाच सहा वर्षांपासून शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ पोलिसांच्या माध्यमातून गरीब आदिवासींपर्यंत पोहचू लागला आहे. त्यामुळे त्यांचा पोलिस व प्रशासनावरचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पोलिसांची ही कार्यशैली आदिवासी बांधवांना आकर्षित करू लागली आहे. त्याचा परिणाम नक्षल्यांचा जनाधार झपाट्याने कमी होत आहे.
नक्षल चळवळीत आदिवासींची केवळ दिशाभूल होत आहे. अंतर्गत वादामुळे अनेक नक्षलवादी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळले असून आत्मसमर्पणाच्या तयारीत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षात ही चळवळ संपुष्ठात येण्याची शक्यता आहे, असे मत गोपीने व्यक्त केले.