तिसऱ्या भारत जलसप्ताह प्रदर्शनात महाराष्ट्राचे दालन ठरले आकर्षण

0
10

नवी दिल्ली : दुष्काळावर दीर्घकालीन प्रभावी उपाय म्हणून राबविण्यात येणारी ‘जलयुक्त शिवार योजना’, राज्यात पाणी वापर संस्थांचे जाळे वाढविण्यासाठी शासनातर्फे सुरु असलेले प्रयत्न तसेच राज्यातील विविध पाटबंधारे विकास महामंडळांचे प्रकल्प आदींबाबत माहिती देणारे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे दालन येथील प्रगती मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय जलसप्ताह प्रदर्शनास भेट देणाऱ्यांचे आकर्षण ठरत आहे.

केंद्रीय जलस्त्रोत, नदी विकास आणि गंगा नदी संरक्षण मंत्रालयाच्यावतीने येथील प्रगती मैदानाच्या हॉल क्रमांक १४ मधे ‘तिसरा भारतीय जलसप्ताह’ सुरु आहे. या निमित्ताने ‘चिरंतन विकासासाठी पाणी व्यवस्थापन’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनी लावण्यात आली. या प्रदर्शनामध्ये देशातील विविध राज्यातील पाणी व्यवस्थापनासंदर्भात सुरु असलेले विविध उपक्रम आणि केंद्रसरकारतर्फे विविध राज्यातील प्रकल्पांद्वारे सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती देणारे दालन उभारण्यात आले आहेत.

या प्रदर्शनीत महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे दालन उभारण्यात आले. यात राज्यातील कृष्णा खोरे विकास महामंडळ, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातर्फे राज्यात पूर्ण झालेले व पुर्णत्वास येत असलेले मोठे व मध्यम प्रकल्पांची माहिती देण्यात आली. ही माहिती देण्यासाठी पॉवर पाँईट प्रेजेंटेशन, एलईडी आणि ट्रान्सलाईट डिस्प्लेबोर्ड सारख्या आधुनिक माध्यमांचा उपयोग करण्यात आला आहे.

राज्यात दुष्काळाचे संकट वारंवार येऊ नये यासाठी डिलीव्हरिंग चेंज फाउंडेशनची (डीसीएफ) मदत घेऊन आणि कृषी, सिंचन, जलसंधारण व जीवन प्राधिकरण विभागांच्या समुच्चयाने राबविण्यात येणाऱ्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेबाबत माहिती देण्यात येत आहे. राज्यात एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकासांतर्गत येत्या पाच वर्षात अडीच लाख शेततळी, पन्नास हजार नालाबांध, वीस हजार सामुदायिक शेततळी, पाच लक्ष सोलर पंपाची उपलब्धता आदींची माहिती उपलब्ध आहे. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंते विजय घोगरे, अजय दाभाडे आणि संजय कुलकर्णी या दालनाबाबतची माहिती दालनास भेट देणाऱ्या देशविदेशातील पाहुण्यांना देत आहेत.

केंद्रीय जलस्त्रोत, नदी विकास आणि गंगा नदी संरक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत पुण्यातील खडकवासला येथील केंद्रीय जल व विद्युत संशोधन शाळेतर्फे तयार करण्यात आलेले आणि अरूणाचल प्रदेशातील सियांग येथे लावण्यात येणारे ‘टू टायर स्लीप वे‘ मॉडेलही या प्रदर्शनीचे आकर्षण ठरत आहे. छोट्या जागेत योग्य पाणी व्यवस्थापन करून वीज निर्मिती साध्य होणारे हे मॉडेल सियांग येथे बसविण्यात येण्यास अनुकुल असल्याचे पुणे संशोधन शाळेचे वैज्ञानिक एन.पी. खापर्डे यांनी सांगितले. पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळताच हा प्रकल्प सुरु होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जलविद्युत निर्मितीचे ‘टीपीकल मॉडेल ऑफ डेस्लीटींग चेंबर’ आपले लक्ष वेधून घेते. या मॉडेलचा प्रयोग सद्या मुंबईसह, कोचीन, कांडला, हावडा, न्यू मँग्लोर पोर्ट ट्रस्ट, विशाखापट्टणम बंदरावर यशस्वीरित्या काम करत असल्याचे खापर्डे यांनी सांगितले. याठिकाणी ‘द्वीस्तरीय अधिप्लव मार्ग आणि ऊर्जा क्षमण’ हे जलविद्युत निर्मितीचे मॉडेलही बघायला मिळते.