बहुजन संस्कृतिवादाचे साहित्य जन्माला यावे – जयंत पवार

0
21

बुलडाणा : गेल्या सहा महिन्यांत केंद्र आणि राज्यात निर्माण झालेल्या नव्या राजव्यवस्थेमुळे धार्मिक उन्मादाचे वातावरण अचानक उसळून आले असून, जातीय तणावाचे पीळ अधिक घट्ट झाले आहेत. अशा स्थितीमध्ये समविचारी लेखकांनी, विचारवंतांनी व चळवळीतील नेत्यांनी आपल्या विचाराची बैठक अधिक भक्कम करत बहुजन संस्कृतिवादाचे विद्रोही साहित्य जन्माला घालण्याची गरज आहे, अशी अपेक्षा संमेलनाध्यक्ष जयंत पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.
येथील जिजामाता महाविद्यालयातील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख शिवार परिसरात १३ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद््घाटन अहमदाबादचे उर्दू गुजराती कवी जयंतभाई परमार यांचे हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.o्रीराम गुंदेकर, अँड. अरूण शेळके, विद्रोही साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी, सिद्धार्थ जगदेव, कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, संमेलनाच्या मुख्य निमंत्रक जयo्री शेळके, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. दामोधर अंभोरे, उत्तमराव पाटील, कुमुद पावडे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत अवतीभोवती निर्माण झालेले विषमतावादी मठ आणि गड उद्ध्वस्त करून सांस्कृतिक गुलामगिरी लादणार्‍या या व्यवस्था नष्ट करण्याची लढाई अधिक जोमाने लढावी लागणार आहे. धारावी येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनात डॉ.आ.ह. साळुंखे यांनी ‘आता आमच्या धडावर आमचेच डोकं असेल’ असे म्हटले होते. आता १६ वर्षांनंतर देशात निर्माण झालेल्या राजकीय शक्तींमुळे सांस्कृतिक व धार्मिक उन्मादाचे वातावरण डोके वर काढत आहे. त्यामुळे अशावेळी आपल्याच धडावर आपलेच डोके आहे का? हे तपासून बघण्याची वेळ आली आहे.
बहुजनवादी साहित्यिकांना विद्रोही साहित्य चळवळीत स्वत:ला जोडून व ही चळवळ अधिक वेगवान करुन त्याचा धाक प्रतिगामी आणि राज्यकर्त्या शक्तींवर निर्माण करावा लागणार आहे. आपल्या भाषणात धार्मिक उन्मादाची अनेक उदाहरणे देऊन येणारा काळ हा आव्हानात्मक असल्याचे पवार यांनी यावेळी अधोरेखित केले.
जयंतीभाई परमार म्हणाले की, आपण जसे जगतो तसे शब्दात व्यक्त होतो. म्हणून आपले साहित्य हे अधिक प्रामाणिक आहे. ते ताकद निर्माण करते. आपला भूतकाळ हा कितीही वाईट असला तरी तो मांडण्याची लाज आपल्याला वाटत नाही. उलट तो मांडल्यावर या समाजाला लाज वाटते. ही खरी आपली शक्ती आहे. विषमतेच्या विद्रोहाविरोधात महाराष्ट्रातील दलित साहित्याने उभा केलेला लढा हा माणसाला माणसाशी जोडणारा लढा आहे. आता आपला रस्ता आपण तयार करावा व आपल्या वेदना आपणच मांडाव्या. त्यातून एकसंघता निर्माण होईल. स्त्री-पुरूष तुलनाकार ताराबाई शिंदे यांच्या वाड्यावरून समता दिंडीने संमेलनाचा प्रारंभ झाला. या दिंडीमध्ये राज्यभरातून आलेल्या साहित्यिकांसह आदिवासी बांधव मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.