आंबेडकरी साहित्य सर्वभाषिक व्हावे- अविनाश डोळस

0
14

घुग्घुस (चंद्रपूर) : आंबेडकरी साहित्य हे वास्तवात सर्व भाषेचे आणि अखिल भारतीय व्हावे, अशी मनिषा १२ व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. अविनाश डोळस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.
अ.भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने आयोजित १२ व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आज शनिवारी सकाळी १0 वाजता मोहनदास नैमिशराय यांच्या हस्ते थाटात उदघाटन झाले. संमेलनाची सुरुवात बुध्द-भिमगिताने झाली.
यावेळी प्रा. अविनाश डोळस पुढे म्हणाले, आपण बौद्ध झाल्यानंतरही अँड. बी.सी. कांबळेंच्या अध्यक्षतेखाली दलित साहित्य संमेलन घेतले. आंबेडकरी, बौद्ध झालेल्या साहित्यीकांनी तो शब्द स्वीकारुन आपले साहित्य जातीमध्ये बंदिस्त केले. त्या संमेलनाचे उद््घाटन आचार्य अत्रे करणार होते; पण ते आले नसल्याने अण्णाभाऊ साठेंनी उद््घाटन केले. आपले साहित्य व्यापक होण्याऐवजी ते जातीत एकवटले. आजही ते त्यातून बाहेर पडत नाही. कोणा एका साहित्यीकाला पुस्तकाला अथवा एकाच राजकीय नेत्याला मानण्याची तयारी नाही. त्यामुळे आंबेडकरी समाजाला जर कोणी जातीवादी म्हटले तर ते चूक कसे ठरवायचे, असा प्रश्न प्रा. डोळस यांनी केला. आपला मुद्दा विषद करताना त्यांनी अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकारणाचे उदाहरण दिले. ते म्हणाले, अँड. आंबेडकरांनी शेतकरी, वारकरी, ओबीसी यांचे प्रश्न घेऊन राजकारण केले तर आपले विद्वानच त्यांना विरोध करतात, ही शोकांतिका आहे.प्रा. डोळस यांनी सर्व साहित्यीक, विचारवंत व वाचकांना व्यापक विचार करावा व इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. आंबेडकरी साहित्यामुळे बौद्धेत्तर दलित, आदिवासी, भटके विमुक्त, बहुजन यांचेही साहित्य निर्माण झाले. या समाजातून फार मोठय़ा प्रमाणात लेखक, कवी यांची पिढी निर्माण झाली. ही आपल्या आंबेडकरी साहित्याची कमाल आहे. आता ते देशातील सर्व प्रांतातील सर्व भाषेत निर्माण व्हावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. प्रा. अविनाश डोळस यांनी आपले छापील भाषण वाचण्यापेक्षा श्रोत्यांशी मुक्त संवाद साधत आपले प्रभावी भाषण करुन सर्वाना मंत्रमुग्ध केले. मोहनदास नैमिशराय यांनी उद््घाटनपर भाषण केले. मनोहर वाकडे यांनी प्रास्ताविक, अशोक बुरबुरे यांनी भूमिका मांडणारे भाषण केले तर देवानंद सुटे यांनी संदेश वाचन केले. यावेळी मंचावर जिओसिस, प्राचार्या अरुणा लोखंडे, अँड. डॉ. एकनाथ साळवे, मधु बावलकर उपस्थित होते. नागेश पथाडे यांनी आभार मानले. संमेलनास देशभरातून आलेले साहित्यिक उपस्थित होते.