धुमाकूळ घालणारा वाघ अखेर जेरबंद

0
17

भंडारा,दि.23ः- मध्यप्रदेशातील मासूलखापा या गावात लग्नाच्या मंडपातून चालत गेल्यानंतर तुमसर तालुक्यातील सिमावर्ती भागात धुमाकूळ घालणार्‍या वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आले आहे. शुक्र वारी दुपारच्या सुमारास सितासावंगीजवळ चिखला येथील झुडपी जंगलात बेशुद्ध करून त्याला पकडण्यात आले.
अन्य वाघांपेक्षा अत्यंत वेगळा असलेला हा वाघ काही दिवसांपुर्वी मध्यप्रदेशातील मासुलखापा येथील एका लग्न मंडपातून सर्व लोकांच्या समक्ष चालत गेला होता. त्यानंतर १0 डिसेंबर रोजी या वाघाने बावनथडी नदी ओलांडून महाराष्ट्रात प्रवेश केला. १३ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास शौचास गेलेल्या सुंदरटोला येथील शांताबाई झिंगरू करकाडे या महिलेवर वाघाने हल्ला करून जखमी केले होते. तेव्हापासून या वाघ परिसरात धुमाकूळ घालत होता. सितासावंगी या गावी या वाघाने दिवसाढवळय़ा प्रवेश करून वन विभागाची डोकेदुखी वाढविली होती. त्यामुळे या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले होते. त्यानंतर या वाघाला पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली.
भंडारा वन विभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक प्रितमसिंग कोडापे, वनपरिक्षेत्र अधिकारी मडावी, जोशी, चकोले, नवेगाव नागझिरा प्रकल्पाची रेस्क्यु टिम, मानद वन्यजीव रक्षक राजकमल जोब, सिट संस्थेचे शाहीद खान व त्यांची चमू या वाघाच्या मागावर होती. वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे डॉ. दिशा शर्मा व डॉ. बिलाल सय्यद यांनाही ब्रम्हपुरीवरून पाचारण करण्यात आले होते.
वाघाची शोधमोहिम राबवित असताना शुक्र वारी दुपारच्या सुमारास सितासावंगीजवळ चिखला येथील झुडपी जंगलात हा वाघ बसलेला दिसला. त्यानंतर त्याला बेशुद्ध करून पकडण्यात आले. हा वाघ आजारी असल्याने त्याला नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.