कला मनुष्याला जिवंत ठेवण्याचे साहित्य-शाहिर दादा पासलकर

0
10

जवाहरनगर,दि.25 : भविष्यकाळ हे भयंकर आहे. तरुण कार्यकर्त्यांमध्ये कलेचा गुण पेरा. यात शाहिरी असो वा झाडीबोलीतील दंडार, खडी गंमत, भारुड असे नाविन्य वर्तमान काळातील परिवर्तनातील घडामोडींचे अंतर्भाव असावा. कलेल्या सानिध्यात राहल्याने मानवाला नवजीवन, नवसंजीवनी मिळते. परिणामी कला मनुष्याला जिवंत ठेवण्याचे उत्तम साहित्य आहे. असे प्रतिपादन महाराष्टÑ शाहिर परिषद पुणेचे अध्यक्ष शाहिर दादा पासलकर यांनी केले.
तुलसी बहुउद्देशिय शिक्षण संस्था महात्मा गांधी अभ्यास केंद्र व झाडीबोली साहित्य मंडळ साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. घनश्याम डोंगरे, साहित्य नगरी, पेट्रोलपंप जवाहरनगर येथे समारोपीय मुख्य अतिथी म्हणून शाहिर दादा पासलकर बोलत होते. अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष बंडोपंत बोढेकर हे होते. यावेळी ज्येष्ठ लोककलावंत व साहित्यीक विजय जगताप, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवनाथ कुंभरे (गडचिरोली) झाडीबोली साहित्य मंडळ शाखा साकोलीचे अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, स्वागताध्यक्ष महेश टेंभरे, हिरामन लंजे, मधुकर नंदनवार, राम महाजन उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. मधुकर नंदनवार लिखीत भंडारा जिल्ह्यातील लोकनाट्य दंडार या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यापिठ उन्हाळी २०१७ परिक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना परितोषीक देण्यात आले. यात नेहा सेलोकर (बीए), अर्चना ढोबळे (बीकॉम), जयंत पडोळे (बीबीए), किर्ती राहुल (एमए) सीता बाग, योगिता खोब्रागडे, पुजा गेडाम, राखी पाल, सुषमा रुद्रकार, अक्षय बागडे यांचा समावेश आहे.तत्पूर्वी सकाळी ‘माझी पहिली पुस्तक’ या विषयावर डॉ. हेमकृष्ण कापगते यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र घेण्यात आले. यात सहभागी वासुदेव रार्घोते (नागपूर) चंद्रकांत लेनगुरे (गडचिरोली), इंद्रकला बोपचे (आमगाव), विजय मेश्राम (गोंदिया) यांचा समावेश होता.
संचालन डॉ. अनिता वंजारी यांनी तर आभार गजानन कोर्तलाकर यांनी केले. तद्नंतर दंडारमहर्षी रघुनाथ बोरकर यांच्या चळवळीने मला काय दिले, या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. सदर चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी कवयित्री अंजणाबाई खुणे या होत्या. अंजनाबाई खुणे यांनी सादर केलेली कविता ही हिरामण लंजे या भावाला आवतन म्हणून अर्पण केली, असे सांगितले.र.स. गि-हेपुंजे मांडो अंतर्गत असी माझी शाखा या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. अध्यक्षस्थानी लखनसिंह कटरे हे होते. संचालन डॉ. रामलाल चौधरी आभार राजेंद्र घोटकर यांनी केले.

पर्यटकांना आकर्षित करण्याच्यादृष्टीने उत्तराखंडमधील रानीखेतप्रमाणे युध्दविषयक इतिहास व साहित्य यांचे कायम प्रदर्शन आयुध – निर्माणी जवाहरनगर आणि भद्रावती येथे स्थापित करण्यात यावे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा तुमसर नगरीशी आलेला संबंध लक्षात घेता, त्यांचे सांस्कृतिक आणि साहित्यिकदृष्टया समृद्ध अध्ययन केंद्र तुमसर येथे निर्माण करण्यात यावे. बाराव्या शतकातील चक्रधरांचे शिष्य नीलकंठ भंडारेकर हे भंडारा नगरीचे प्रथम ज्ञात आद्य पुरूष असल्यामुळे त्यांचे योग्य स्मारक भंडारा येथे उभारण्यात यावे. गोंदिया व गडचिरोली येथील आदिवासींना शासकीय योजनांची माहिती व्हावी आणि त्यांचे मनोबल वाढावे याकरिता सांस्कृतिक व साहित्यिक संस्थाकरिता शासनाने विशेष अनुदानाची तरतुद करावी. यासह एकूण सात ठराव सर्वांनुमते या संमेलनात पारित करण्यात आले.सूत्रसंचालन दीपक साखरे यांनी केले तर आभार डॉ.आर. डी.पटले यांनी मानले. याप्रसंगी आचार्य पदवी प्राप्त करणारे डॉ.नरेंद्र आरेकर व वि.सा.संघाचा पुरस्कार प्राप्त डॉ.मधुकर नंदनवार यांचा गौरव करण्यात आला.