महिलांच्या आयुष्यात सुधारणेसाठी कटिबद्ध – मोदी

0
9

– पीटीआय
नवी दिल्ली – महिलांविरोधातील अत्याचाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी “मोबाईल हेल्पलाईन‘ व विशेष केंद्राची स्थापना करण्याची घोषणा केली. जागतिक महिला दिनानिमित्त सरकारची भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधानांनी महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणण्याचे ध्येय हे केंद्र सरकारच्या विकासात्मक धोरणाच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगितले.

“महिलांविरोधातील अत्याचाराच्या घटना पाहिल्यानंतर मान लाजेने खाली जाते. महिलांविरोधील सर्व प्रकारचा अन्याय संपविण्यासाठी आपण एकत्रितरित्या प्रयत्न करावयास हवा. आज आपल्या विकासाच्या प्रवासामध्ये महिलांना सामावून घेऊन, त्यांना समान स्थान देण्याच्या आमच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करावयास हवा. महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी माझ्या सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत. हिंसाचार वा इतर स्वरुपाच्या अत्याचाराचा सामना करावयास लागलेल्या महिलांना कायदेशीर सल्ला व मानसिक समुपदेशनाची सुविधा देण्यासाठी सरकार विशेष केंद्रे स्थापन करत आहे. याचबरोबर महिलांसाठी 181 या क्रमांकावर विशेष हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विविध योजनांच्या माध्यमामधून महिलांच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणण्याप्रति सरकार कटिबद्ध आहे,‘‘ असे मोदी यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, प्रधान मंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधान मंत्री जीवन बीमा योजना आणि अटल पेन्शन योजना या नुकत्याच संसदेत मांडलेया अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या योजनांमुळेही महिलांना मोठी मदत मिळणार असल्याचे निरीक्षण मोदी यांनी यावेळी नोंदविले.