मुंबई- ‘बिब घ्या बिब शिककाई.., परिकथेतील राजकुमारा..गोड गोजिरी लाज लाजिरी.. अशा एकाहून एक अवीट गोडीच्या मराठी व २०० हून अधिक हिंदी गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांचे रविवारी निधन झाले. त्या ७४ वर्षाच्या होत्या.
गेल्याच वर्षी त्यांना राज्य सरकारच्या ‘लता मंगेशकर’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. कृष्णा कल्ले यांच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कल्ले यांनी मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी, मीनू पुरुषोत्तम, उषा तिमोथी आदी गायकांसोबतही गाणी गायली. ओ. पी. नय्यर, कल्याणजी-आनंदजी, मदन मोहन, जयदेव, शंकर जयकिशन आदी संगीत दिग्दर्शकांबरोबर काम केले.
कृष्णा कल्ले यांचा स्वरप्रवास
कृष्णा कल्ले या एक मराठी सुगम संगीत गायिका आहेत. त्यांनी १९६० तसेच १९७० च्या दशकात दोनशेहून अधिक िहदी व शंभरहून मराठी गाणी गायली आहेत. ‘केला इशारा जाता जाता’ आणि ‘एक गाव बारा भानगडी’ या त्याकाळी गाजलेल्या चित्रपटांतील लावण्या त्यांनीच गायलेल्या आहेत. त्या इ.स. १९६० पासून मुंबई आकाशवाणीच्या ’अ’ श्रेणीच्या गायिका होत्या.