गोंदिया : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने १२ मार्च रोजी जिल्हा परिषद सभागृहात पेंशन बचाव परिषदेचे आयोजन करण्यात होले होते.
अध्यक्षस्थानी डॉ. यु. एल. यादव होते. मार्गदर्शक म्हणून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस सुनील जोशी, चंद्रहास सुटे, इंद्रजित गुरव, माजी कार्याध्यक्ष गजानन सेट्टे आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस अशोक थुल, सरचिटणीस व्ही.एम. सौरगपते, चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष लतीफ पठाण, अधिकारी-कर्मचारी संघटनेचे दुलीचंद बुद्धे, मध्यवर्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस लीलाधर पाथोडे, पाटबंधारे संघटनेचे विठ्ठल भरणे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष पी.जी. शहारे, प्राथमिक शिक्षक संघाचे आनंद पुंजे, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय धार्मीक व विक्रीकर संघटनेचे अध्यक्ष अरविंद अरवेली उपस्थित होते.
कार्यक्रमात वर्ष २००५ पासून सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाने परिभाषीत अंशदायी निवृत्ती योजना अंमलात आणली आहे. या योजनेतुन कर्मचाऱ्यांना काय मिळणार आहे, कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित राहणार आहे काय, सामाजिक सुरक्षा म्हणून इंग्रज सरकारने सर्वांना वैद्यानिक पेंशन देण्याचा कायदा केला होता. परंतु आता नवीन अंशदायी पेंशन योजनेमुळे पुढील आयुष्यातील जीवन जगणे फार कठीण होणार आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये १० टक्के वेतनातून कपात केलेल्या आणि १० टक्के शासन जमा करणार असलेल्या रकमेचा हिशेब नाही, अनेक कर्मचाऱ्यांचे खातेही उघड्यात आलेले नाही.
२००५ नंतर सेवेत असलेल्या एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या परिवाराला काहीच फायदा देण्यात आलेला नाही आदी विषयांवर मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी पाटबंधारे संघटनेच्यावतीने ५० हजार रुपये वर्गणीचा धनादेश मध्यवर्ती संघटनेला देण्यात आला. संघटनेकरिता सर्व कर्मचाऱ्यांनी लढा निधी देऊन संघटना बळकट करण्याची घोषना करण्यात आली असून संघर्षाशिवाय पर्याय नाही. त्याकरिता सर्व कर्मचाऱ्यांनी एकजूट होऊन तनमनधनाने संघटनेस सहकार्य करण्याचे आवाहन व्यासपीठावरुन करण्यात आले.
दरम्यान, अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणी मंडळात राष्ट्रियस्तरावर उपाध्यक्ष म्हणून निवड झालेले सुनील जोशी व अशोक थुल यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) आर.एल. पुराम यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
मेळाव्याला जिल्हास्तरावरील राज्य शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, महसूल कर्मचारी, पाटबंधारे कर्मचारी, विक्रीकर कर्ममारी, वन विभागातील ३०० च्या वर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. प्रस्ताविक पाथोडे यांनी मांडले. आभार शहारे यांनी मानले.
मेळाव्यासाठी के.व्ही. नागफासे, रवींद्र नागपुरे, नरेंद्र रामटेककर, कक्ष अधिकारी अधीक्षक संघटनेचे जी.एस. पवार, महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख विनोद चौधरी, जिल्हा संघटक संतोष तुरकर, जिल्हा सल्लागार सुभाष खत्री, राजेश कुंभलवार, डी.एस. लोहबरे, लीलाधर तिबुडे, कारुजी मेश्राम, पी.पी. काळे, एच.व्ही. गौतम, एम.आर. पटले, एस.आर. लिचडे, राऊत यांनी सहकार्य केले.