मुंबई, – ‘ जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ‘ हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचवणारे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. मराठी सिनेसृष्ठीतील दिग्दर्शक केदार शिंदे त्यांचा नातू आहे.उद्या सकाळी भोईवाड्यातील घरी त्यांचा देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत साबळे यांचे मोठे योगदान होते. शाहीर साबळे हे केवळ मनोरंजनातून प्रबोधन करणारे शाहीर नव्हते तर उत्तम कवी-संगीतकार, अभिनेते- दिग्दर्शक, कुशल ढोलकीवादक, उत्कृष्ट व्यवस्थापक व संघटक आणि उच्च प्रतीचे गायकही होते.
शाहिर साबळे यांचा जीवन परिचय –
शाहीर साबळे यांचा जन्म १९२३ साली सातारा जिल्ह्यातल्या, वाई तालुक्यातील पसरणी गावात झाला. जात्यावर ओव्या गाणारी आई आणि भजनं गाणारे वारकरी वडील यांच्याकडून त्यांना गायनाचे बाळकडू मिळाले. सुरूवातील जन्मगावी शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमळनेरला त्यांच्या मामांकडे गेले. सातवीनंतर त्यांनी शिक्षण सोडले. मात्र अमळनेरला असताना त्यांना साने गुरूजींचा सहवास लाभला आणि त्यांच्यावर राष्ट्रीयत्व आणि निर्व्याज देशभक्तीचे संस्कार झाले. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत जनजागृती करण्यासाठी गुरुजींबरोबर ते दौरे करू लागले. राजकीय व सामाजिक अपप्रवृत्तीवंर प्रहार करण्यासाठी शाहिरी माध्यमाचा उपयोग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. १९४२ साली ते शाहीर शंकरराव निकम ह्यांच्या प्रभावाखाली आले आणि त्यांच्याकडूनच त्यांनी शाहिरी कलेचे प्रत्यक्ष धडे घेतले. हैदराबाद मुक्तिसंग्रामातही त्यांनी प्रचाराचे रान उठवले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी ‘जातीयवाद की समाजवाद’ (१९४७) हा पहिला पोवाडा लिहिला. स्वतंत्र भारतात नव्याने सुरु झालेल्या राजऐकारणाचा संदर्भ ह्या पोवाड्याला होता. ‘आधुनिक मानवाची कहाणी’ हा त्यांचा विशेष उल्लेखनीय पोवाडा.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देताना शाहिर साबळेंनी महाराष्ट्रभर प्रचार करुन अनुकूल वातावरण निर्माण केले.संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवामुक्ती आंदोलन ह्यांतही जनजागृतीसाठी त्यांनी प्रभावी शाहिराची भूमिका बजावली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर कवी राजा बढे ह्यांनी रचलेले आणि श्रीनिवास खळे ह्यांनी संगीतबद्घ केलेले ‘गर्जा महाराष्ट्र माझा ‘हे गीत शाहिरांनी गायिले. ह्या गाण्याने त्यांना उदंड कीर्ती लाभली. महाराष्ट्र राज्यात मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यासह जनजागृतीसाठी दौरे केले; तसेच आंधळं दळतंय हे मुक्तनाट्य लिहून रंगभूमीवर आणले. त्यातून शिवसेनेच्या निर्मितीला प्रेरणा मिळाली.
‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यकमाने त्यांच्या जीवनात एक मोठे यश आले. महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोकांच्या कलांना एकत्र आणून त्यांचे सादरीकरण करण्याची कल्पना त्यामागे होती. या कार्यकमातून लावणी, बाल्यानृत्य, कोळीनृत्य, गोंधळीनृत्य, मंगळागौर, वाघ्यामुरळी, वासुदेव, धनगर इत्यादींचे जिवंत दर्शन घडविण्यात आले.
शाहिर साबळे यांना अनेक मानसन्मान मिळाले. १९८४ साली त्यांना संगीत नाटक अकादेमीचा पुरस्कार जाहीर झाला तर १९८८ साली ते शाहीर अमर शेख पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले. अखिल भारतीय शाहिरी परिषदेच्या अध्यक्षपदासोबतच (१९९०) अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे ते एकमेव शाहीर होते. १९९८ साली त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.