नागरी समस्या सोडविण्यासाठी तीन महिन्यात निर्णय घेणार – मुख्यमंत्री

0
11

ठाणे : कल्याण – डोंबिवली परिसरातील घनकचरा, क्लस्टर डेव्हलेपमेंट, स्लम, प्रदूषण, रस्ते, पाणी असे अनेक नागरी प्रश्न सोडविण्यासाठी पुढील तीन महिन्यात निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली येथे दिले.
येथील गणेशमंदीर संस्थानतर्फे आयोजित नववर्ष स्वागत यात्रेच्या कार्यक्रमात श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी महापौर कल्याणी पाटील ,खासदार कपील पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, नगरपालिका, महानगरपालिकांनी घनकचरा व्यवस्थापनासाठी एक योजना तयार करावी. त्यासाठी सरकार पन्नास टक्के निधी देईल. त्याचबरोबर नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम देऊन सर्वच नागरी समस्यांचे निवारण करावे. आज राज्यात पाण्याचा, दुष्काळाचा प्रश्न आहे. त्यावर मात करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाबरोबरच केंद्र शासनही मदत करणार आहे. जवळपास 5 हजार गावे दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प सरकारने केला आहे. जलशिवार योजनेसाठी मोठा निधी खर्च करणार असून गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार काम करीत आहे.
याच कार्यक्रमात एलबीटी रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्या बद्दल व्यापारी संघटनेतर्फे मुख्यमंत्र्याचा सत्कार करण्यात आला. तसेच गणपती संस्थानने तयार केलेल्या नूतन वर्षानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, महापौर कल्याणी पाटील यांचीही भाषणे झाली.