राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची मोहोर

0
15

नवी दिल्ली – 62 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर पुन्हा एकदा मराठी चित्रपटानेच वर्चस्व निर्माण केले आहे. चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या वास्तववादी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. आगामी 17 एप्रिलला हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तर ‘एलिझाबेथ एकादशी’ सर्वोत्कृष्ट बालपट आणि ‘किल्ला’ विशेष उल्लेखनीय पुरस्काराचे मानकरी ठरले.
मंगळवारी दिल्लीत ६२ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मराठी भाषा श्रेणीत किल्ला हा सर्वोत्कृष्ट चित्रपट तर एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरला. हिंदी चित्रपटांमध्ये ‘क्वीन’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला असून या चित्रपटातील कसदार अभिनयासाठी कंगना राणावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हैदर चित्रपटालाला चार श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. नानू अवनल्ला अवलू या कन्नड चित्रपटातील अभिनयासाठी विजय यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. मेरी कॉमला लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.
‘कोर्ट’ या सिनेमाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करत म्हटले, ”बाहेरच्या लोकांना आमचा चित्रपट आवडेल, खरं तर अशी अपेक्षा केली नव्हती. हा पुरस्कार मिळणे आमच्यासाठी एक आश्चर्याची आणि नशीबाची गोष्ट आहे. सर्वांनी पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. एवढा मोठा पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद होतोय.’कोर्ट’ला यापूर्वी 17 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. हा सिनेमा करण्यासाठी तब्बल 4 वर्षे मेहनत घेतली. निर्मात्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्याचे सार्थक झाल्यासारखे वाटत आहे. स्वप्नातही विचार केला नव्हता, की मला हा पुरस्कार मिळेल. कारण मी आतापर्यंत मला जे आवडले तेच करत आलोय. वयाच्या 19व्या वर्षापासून मी माझ्या आवडीचे काम करतोय. सर्वांकडून असाच पाठिंबा मिळत राहावा अशी इच्छा.”