शासनाची तिसरी श्रेणी लाचखोर

0
9

मुंबई,दि.2 : शासकीय सेवेतल्या तिसऱ्या श्रेणीत काम करणारे अधिकारी, कर्मचारी सर्वाधिक लाचखोर तर चतुर्थ श्रेणी सर्वात प्रामाणिक असल्याचे लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमधून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

पहिल्या तीन महिन्यांमध्ये एसीबीने राज्यभरात लाचखोर अधिकाऱ्यांसाठी एकूण ३२५ सापळे रचून एकूण ४१९ आरोपींना गजाआड केले. त्यात तिसऱ्या श्रेणीतल्या तब्बल २६६ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर एकूण कारवायांमध्ये चतुर्थ श्रेणीतले फक्त १४ कर्मचारी, कामगारांना अटक झाली आहे. १ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान एसीबीने राज्यात केलेल्या कारवायांची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ६२ सापळयांची भर पडली आहे. हे प्रमाण २४ टक्के असून एकूण सापळयांमध्ये गृहविभाग, महसूल आणि ग्रामविकास विभाग आघाडीवर आहेत. या तीन विभागांमधील तब्बल दोनशे सापळे रचण्यात आले.

या तीन महिन्यात लाच स्वीकारताना ८६ पोलीस, ४१ तलाठी, २१ इंजिनिअर, ८डॉक्टर, ७ शिक्षक, ३ सरकारी वकील, २ नगरसेवक-महापौर, १ सरपंच आणि २ सभापती-नगराध्यक्ष गजाआड झाले आहेत. सापळा कारवायांमध्ये एसीबीने सुमारे ८३ लाखांची मालमत्ता हस्तगत केली. तर ६ कोटी ८९ लाखांची मालमत्ता बेहिशोबी असल्याचे स्पष्ट झाले आहे.