कोणत्याही ठिकाणी आपण गेलो तर प्रत्येकाची एक ओळख असते ती आपणाला सांगावी किंवा दाखवावी लागते. यासाठी आपल्याकडे अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध असतात. निवडणुक आयोगाकडून मतदान करण्यासाठीही अशाच प्रकारे मतदारांना ओळखपत्र तयार करुन दिले आहे. या ओळखपत्राचा वापर करुन मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश दिला जातो. जर हे मतदान ओळखपत्रच आपल्याकडे नसेल तर करायचे काय? बहुतेक मतदार ओळखपत्र हरवतात किंवा ते ऐनवेळी सापडत नाही. आणि यामुळे ते मतदानाला जाण्यास टाळतात. परंतू निवडणुक आयोगाने मतदान ओळखपत्राला एकुण 11 पर्याय दिले आहेत. याबाबत सर्व मतदारांना याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.
यामध्ये- 1) आधार कार्ड 2) वाहन चालक परवाना 3) शासकीय ओळखपत्र 4)छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक 5) पॅन कार्ड 6) NPR अंतर्गत RGI द्वारे दिलेले स्मार्ट कार्ड 7) मनरेगा कार्यपत्रिका 8) आरोग्य विमा स्मार्ट कार्ड (कामगार मंत्रालय) 9) छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज 10) पारपत्र 11) खासदार/आमदार/वि.प.सदस्य यांनी दिलेले ओळखपत्र यांचा समावेश आहे.
आणि हो आपल्याकडे मतदान ओळखपत्र आहे किंवा या 11 पैकी कोणतेही ओळखपत्र आहे, परंतू मतदार यादीतच नाव नाही तर मात्र मतदान करता येणार नाही. यासाठी मतदारांनी आपले नाव यादीत आहे की नाही याची खात्री करावी. नाव नसेल तर आपली तक्रार 1950 किंवा वेबसाईटवर किंवा मोबाईल ॲपवर नोंदवावी. तेव्हा मतदानादिवशी मतदान करायला मिळाले नाही तर नाराजी ओढावून घेण्यापेक्षा आजच आपले नाव तपासून, ओळखपत्र आहे की नाही याची खात्री करु. काही अडचण असल्यास प्रामुख्याने निवडणूक आयोगाची वेबसाईट www.nvsp.in आहे. तसेच मोबाईल ॲप voter helpline उपलब्ध आहे. तसेच टोल फ्री 1950 या क्रमांकावर संपर्क साधा. आपल्याला निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय यासाठी मदत करत आहे. वरील पैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर केल्यास Voter Slip दिली जाते.





