सौ. मनिषा पिंटू वराळे यांचे ‘सौ. मनिषा पिंटू वराळे: समग्र वाङ्मय’ हे सौ. संजीवनी सुनील पाटील यांनी संपादित केले पुस्तक मी हातात घेतले आणि मला आश्चर्याचा एक सुखद धक्का बसला. दारात लावलेले एक इवलेसे रोप पाहता-पाहता मांडवावर चढून त्याची घनगर्द सावली अनुभवल्यानंतर जी एक भावविभोर अवस्था होते त्याची प्रत्यक्ष अनुभूती मला आली.
मनापासून आनंद होणे, सुखाने अंगावर काटा येणे, डोळ्यात आनंदाश्रू दाटणे हे शब्द वापरायला खूप सोपे आहेत परंतु त्याची प्रत्यक्ष अनुभूती येणे हे फार-फार दुर्मिळ झाले आहे आणि या सर्व गोष्टींचा एकत्रित सुखानुभव ‘सौ. मनिषा पिंटू वराळे: समग्र वाङ्मय’ हे पुस्तक हातात घेताच झाला.
अर्थातच याची अनेक कारणे आहेत. एकतर पुस्तकाच्या शीर्षकातच उद् घोषणा आहे की, हा पहिला खंड आहे. म्हणजे ही काही अखेरची मेजवानी नाही. अजून बरंच काही वाचायला म्हणजेच अनुभवायला, चाखायला मिळणार आहे.काव्याबरोबरच कथा असेल, कादंबरी असेल, नाटकं असतील असं बरंच काही आगामी आकर्षण शीर्षकात सूचित होत आहे. त्यामुळे भविष्याची गोड हुरहूर या शीर्षकात आहे. कवयित्रीची भारदस्त छबी आणि समोरचे लेखणीसह मनाला लुभावणारे मोरपीस पाहून पुस्तक हातात पडले तेव्हा माझी ती संध्याकाळ खरोखरच प्रसन्न झाली.
डॉ. सुनील दादा पाटील या अत्यंत धडपड्या प्रकाशकाचं कौतुक मनात दाटून आलं आणि ते मशागत करत असलेल्या शेतातील हे आणखी एक मोत्याच्या दाण्याने लगडलेले भरीव कणीस पाहून खरोखरच तृप्तीची ढेकर आली.
हे पुस्तक आवडण्याचे दुसरे कारण म्हणजे संपादकांनी या ‘सौ. मनिषा पिंटू वराळे: समग्र वाङ्मय’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलेली काव्याबद्दलची अभ्यासपूर्ण प्रस्तावना. एम्. ए. च्या मराठी विषय घेऊन द्विपदवीधारक होऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना भाषाशास्त्राचा एक पेपर द्यावा लागतो. त्यांच्या दृष्टीने ही प्रस्तावना म्हणजे अलिबाबाची गुहाच ठरणार आहे. या प्रस्तावनेत त्यांनी काव्याबद्दल लिहिताना त्याच्या प्रारंभापासून म्हणजे ‘अंगाई’ पासून ते जपानी काव्यप्रकार ‘हायकू’ पर्यंत जो आढावा घेतला आहे तो मनस्वी वाचनीय व अर्थपूर्ण आहे.
अंगाई, अभंग, ओवी, गझल, चित्रपट गीत, दशपदी, दिंडी, संगीत नाटक, नांदी, सूचकगीत, कथानक, पोवाडा, भावगीते, लावणी, सुनीत व शेवटी जपानी भाषेतील एक काव्यप्रकार ‘हायकू’ पर्यंत त्यांनी या प्रत्येक प्रकारावर जे भाष्य केले आहे. ते खरोखरच अप्रतिम आहे. मराठी काव्यप्रकारावर या संपादनाच्या माध्यमातून एक छोटा पण मौलिक प्रबंधच त्यांनी लिहिला आहे. मराठी भाषिकांना हा एक मौलिक ठेवाच या निमित्ताने मिळाला आहे असे म्हणावेसे वाटते.
त्याचबरोबर आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील व आता महाराष्ट्रभर ख्यातकीर्त झालेले एक विशेष व्यक्तिमत्त्व ज्यांना जनतेने ‘व्याख्यान केसरी’ हा किताब दिला आहे व जे स्वतः सिद्धहस्त लेखक आहेत. चिंतनशीलता व शालीनता हा ज्यांचा स्थायीभाव आहे त्या ज्येष्ठ लेखक विजय दादा आवटी यांचा ‘काव्यानंद घेण्यापूर्वी…’ हा शुभाशीर्वाद सर्वांनाच अंतर्मुख करणारा व या ग्रंथाबद्दल बरंच काही सांगून जाणारा आहे.
सर्वश्री आबासाहेब सूर्यवंशी, प्रा. प्रवीणकुमार हेमचंद्र वैद्य, मंगेश विठ्ठल कोळी, सौ. सुवर्णा चव्हाण, डॉ. श्रीकांत तापीकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अशोक दादा पाटील यांनीही सौ. मनिषाच्या काव्यलेखनाबद्दल त्यांच्या कविता मनापासून वाचून त्याबद्दलची स्वत:ची मते सानंद नोंदविली आहेत. एकंदरीत डॉ. सुनील दादा पाटील यांनी ‘सौ. मनिषा पिंटू वराळे: समग्र वाङ्मय’ या पुस्तकाचा प्रपंच अत्यंत बहारदार झाला आहे.
या पुस्तकाच्या नव्हे नव्हे ग्रंथाच्या बाह्यरंगातून आंतररंगात प्रवेश करताना प्रथम जी भव्यता लक्षात येते ती या काव्यसंग्रहात समाविष्ट असलेल्या २५० कवितांची. कदाचित याहूनही आणखी बर्याच कविता कवयित्रीने लिहिल्या असतील, त्यातील निवडक कविता या खंडात समाविष्ट असतील पण अनेक विषयाबद्दलच्या नानाविध कविता साकारताना कवयित्री बहूअंगांनी फुलून आलेली दिसते. स्त्रीबद्दल लिहिताना, बोलताना अनेक महान व्यक्तींनी म्हटले आहे की, “स्त्री हीच मुळी विधात्याने निर्माण केलेली या सृष्टीतील एक सुंदर कलाकृती आहे.”
पण मी या कविता प्रत्यक्ष वाचल्यानंतर सारांश रूपाने म्हणेन की, “या प्रत्येक कलाकृतीने तिच्या मनातील एक-एक भावना उलगडून दाखविली तर ती एक एक भावना म्हणजे एक एक खंडकाव्य ठरेल.”
अर्थातच या ग्रंथातील म्हणजेच ‘सौ. मनिषा पिंटू वराळे: समग्र वाङ्मय’ मधील अनेक कविता या ‘आई’ या महान व अत्यंत महत्त्वाच्या व जिव्हाळ्याच्या विषयावर लिहिल्या गेल्या आहेत व ते स्त्री स्वभावाला धरूनच आहे. स्त्री ही स्वतः जगन्माता आहे व या मातेने आपल्या मातेबद्दल लिहावे हे जेवढे नैसर्गिक आहे तेवढेच वाचनीय व मननीयसुद्धा आहे. त्यामुळे गर्भातील अर्भकापासून ते आईपर्यंतच्या अनेक भावअवस्था पानोपानी प्रकट झाल्या आणि ‘गर्भकन्येची हाक’ या ७३ क्रमांकाच्या कवितेत त्यांनी कल्पना चावला, सानिया, तेजस्वीनी, प्रतिभाताई इत्यादी अनेक थोर स्त्रियांचा उल्लेख करून स्त्रीअर्भक या जगात प्रवेश करू दे, तिला गर्भातच रोखू नका अशी भावनिकदृष्ट्या साद त्यांनी वाचकांना घातली आहे.
‘आई’ हा विषय मोठा आहे पण एका वेगळ्याच दृष्टीकोनातून या विषयावर सौ. मनिषाताईंनी प्रकाशझोत टाकला आहे. ‘आई’ या विषयावरील सर्वच कविता एकत्र केल्यास त्याचा एक स्वतंत्र काव्यसंग्रह तयार होईल यात शंका नाही.कुटुंब व्यवस्था आणि नाती हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे आणि भारतीय स्त्री म्हटलं की, ती सर्व नाती व संसार यांचे वर्णन हे ओघाने येणारच. अशा विविध मानवी नात्यांवर त्यांनी अनेक कवितेतून आपले विचार प्रकट केले आहेत. काही वेळा तर अत्यंत दाहकपणे त्यांनी काही कटू प्रसंगांवर प्रहारही केले आहेत. भाऊ, बहीण, सासू, सासरे, नणंद, भावजय, मामा, मामी अशा अनेक जवळच्या व लांबच्या नात्यांवर त्यांनी अत्यंत मार्मिक व जसे मनात अंकुरले तसे भाष्य केले आहे.
‘बंदिवान मी या संसारी’ या कवितेतून स्त्रीची घुसमट परखडपणे मांडताना त्या लिहितात –
सून, भावजय, बायको आणि आईही मी झाले
प्रत्येक अश्रू डोळ्यातच साठवू लागले
अरे मन नावाची चीजच नाही हे जेव्हा कळले
अक्षरशः धारतीर्थ मी पडून राहिले
अशीच मी बंदिवान या संसारी झाले
समस्त स्त्रियांची प्रतिनिधी म्हणून अशा अनेक प्रतिक्रियातून भारतीय स्त्रीची एक प्रतिमा आपल्यासमोर येते व सर्व समाज धुरिणांनी, विचारवंतांनी, समाजसेवकांनी यावर खूपच विचार करावा असे एक आवाहन हे ‘स्त्री मन’ करताना दिसते.
पण या सार्यात ती अगतिक झालेली दिसत नाही पण स्त्रीची महती ही अशी असते.
‘स्त्री जातीचं जगणं’ या कवितेत ती रणरागिणी होऊन म्हणते –
पण लढवय्यी तू रणरागिणी सोड असहाय्य जीणं
अगं लढ तू… लढ यश मिळव हे धाडसानं
म्हणून सांगते लेखणी दिलीय सावित्रीनं
रेखाट तुझं जीवन आणि मिटव सारी दूषणं
अशी लढवय्यी हो तू तुला सलाम करावा दुनियेनं
स्त्रीची महती ही अशी असते. ती कोमल, अबला, निराश अशी काही वेळा दिसली तरी ती रणरागिणीही होऊ शकते नव्हे ती ताकद तिच्यात आहे. हे पाहून मनालाही बरं वाटतं.
आईबरोबरचं बाबांच्याही कविता अत्यंत वाचनीय झाल्या आहेत. ‘बाबा तुमच्यासाठी’, ‘बाबांचं मन’, ‘आई बापाची व्यथा’ या कवितांमधून आपल्या समाजातील दु:खी, कष्टी शंकाग्रस्त अशा पुरुषांचं जीवन वाचून अंत:करणाला वेदना झाल्याशिवाय राहत नाही.अशा एक ना अनेक विषयांवर अनेक कवितेमधून तो प्रकाशझोत टाकला आहे. तो समजून घेण्यासाठी या कविता वाचून त्याची प्रत्यक्षानुभूती घेणे आवश्यक आहे. म्हणतात ना साखर कशी आहे? याचं वर्णन करून का भागणार आहे. साखरेची गोडी अनुभवण्यासाठी त्याची प्रत्यक्ष चवच घेणे आवश्यक आहे.
कवी केशवसूतांनी म्हटल्याप्रमाणे स्वतःच्या उत्स्फूर्त भावनांच्या उद्रेकासाठी, स्वतःसाठी म्हणून या कविता कवयित्रीने लिहिल्या आहेत. वृत्त, अलंकार, छंद इत्यादी गोष्टींच्या बंधनात न अडकता अगदी सहज व सुलभ भाषेत अगदी सहजपणे सहज सोप्या भाषेत म्हणजे सामान्यांच्या भाषेत भावनांना फुलू दिलं आहे आणि हेच या कवयित्रीचे वैशिष्ट्य म्हणता येईल म्हणूनच या कविता आपणाला आपल्या वाटतात यातच तिचं यश सामावलं आहे.
‘सौ. मनिषा पिंटू वराळे: समग्र वाङ्मय’ ही एक बेजोड साहित्यकृती आहे. हे एक रचनात्मक काम आहे. एखाद्या कारखान्याची उभारणी, शिक्षण संस्थेची उभारणी, एखाद्या धरणाचं बांधकाम, एखाद्या राजकीय संघटनेच्या पक्ष बांधणीचं काम, एखाद्या कामगार संघटनेच्या बांधणीचं काम या सगळ्या गोष्टी जशा रचनात्मक कामात मोडतात तसेच साहित्यिकांना प्रोत्साहन देणं, त्यांच्याकडून काही साहित्यकृती लिहून घेऊन त्यांना एका विशिष्ट वर्तुळात का होईना एक ठसठशीत अस्तित्व निर्माण करून देणं हेसुद्धा एक रचनात्मक कामचं आहे. मात्र ही गोष्ट अत्यंत अवघड असते. ती सहजासहजी होत नाही. अनेक पातळ्यावर त्यासाठी संघर्ष करावा लागतो. प्रसंगी मरण यातना सोसाव्या लागतात. ते काम नोहे ऐरागबाळ्याचे मोठी कठीण व अशक्यप्राय गोष्ट असते ती.
पण ही अतिशय अवघड किमया आमचे तरुण मित्र डॉ. सुनील दादा पाटील यांनी जयसिंगपूर परिसरात वास्तवात आणून दाखवली आहे आणि त्यांना सर्वांगांनी साथ देत आहेत त्यांच्या उत्तम विद्याविभूषित सौ. संजीवनी सुनील पाटील.
या दांपत्याच्या कार्यास अनेकानेक शुभेच्छा…!
सौ. मनिषा पिंटू वराळे यांच्या हातून अशाच अनेकानेक दर्जेदार साहित्यकृती निर्माण होवोत असा शुभाशीर्वाद…!
– प्राचार्य बी. बी. गुरव
साहित्यिक व समीक्षक
संपर्क – ९४२१२८७१०७ , ९९७५८७३५६९





