पंतप्रधान मोदीनी जवांगा येथे शाळकरी मुलांशी साधला संवाद

0
18

वृत्तसंस्था
रायपूर दि. ९ – पंतप्रधान दंतेवाडा येथे पोहोचले आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आदिवासींची पारंपरिक टोपी त्यांच्या डोक्यावर ठेवण्यात आली.
पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी प्रथमच छत्तीसगडमध्ये पोहोचले आहेत. शनिवारी सकाळी ते नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा गड समजल्या जाणाऱ्या बस्तर येथे पोहोचले.
त्यांनी दंतेवाडामधील जवांगा येथे शाळकरी मुलांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले त्याची मोदींनी उत्तरे दिली. पराजयातून विजयाचा धडा घेणे हा यशस्वी होणाचा मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

एका विद्यार्थीनीने, तुम्ही 18 तास काम करता असे ऐकले आहे. एवढे काम केल्यावर तुम्ही थकत नाही का, असा प्रश्न विचारला. त्याच्या उत्तरात मोदी म्हणाले, ‘शिक्षक तुम्हाला गृहपाठ देतात. तो पूर्ण केल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवतो का? काम पूर्ण झाल्यानंतर थकवा जाणवत नाही. जोपर्यंत काम साचलेले असते तेव्हा थकवा जाणवतो. दुसरे असे की तुम्ही आपल्या लोकांसाठी काम केल्यावर थकवा येत नाही. सव्वासे कोटी भारतीय माझे आपले आहेत.’
मुख्यमंत्री रमन सिंह यांनी केले स्वागत
पंतप्रधान विशेष विमानाने जगदलपूर येथे पोहोचले तिथे मुख्यमंत्री रमन सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांच्या आगमानापूर्वी काही तास आधी नक्षलवाद्यांनी जगदलपूरच्या जवळील काकलूर येथील रेल्वे रुळ उडवून दिले. दुसरीकडे सुकमा येथे नक्षलवाद्यांनी एका गावातील 500 लोकांना ओलीस ठेवले आहे. हे सर्व लोक मोदींच्या सभेसाठी जाणार होते, त्यामुळेच त्यांना ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती आहे. नक्षलवाद्यांनी पंतप्रधानांच्या बस्तर दौऱ्यावर बहिष्कार टाकला आहे.
नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा गड समजल्या जाणाऱ्या बस्तरमध्ये पंतप्रधानांचा दौरा असल्याने सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जमीनीबरोबरच हवाई पाहाणी केली जात आहे. जगदलपूरपासून दंतेवाडापर्यंत 10 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. शेजारी राज्यांच्या सीमा सील केल्या गेल्या आहेत.