नागपूरला रेल्वे झोन करा

0
15

नागपूर -मध्य भारतातील सर्वात महत्त्वाचे शहर असलेल्या नागपूरला रेल्वे झोनचा दर्जा द्यावा, अशी मागणी भारतीय यात्री केंद्राने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. यात्री केंद्राचे सरचिटणीस बसंतकुमार शुक्ला यांनी यासंबंधातील पत्र केंद्रीय भुपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे.

नागपूरला झोनचा दर्जा द्या ही मागणी जुनी आहे. असा दर्जा मिळाल्यास रेल्वे प्रवाशांना येथे अधिकच्या सुविधा मिळतील. नागपूर शहर देशाच्या मध्यभागी आहे. बुटीबोरीसारखी औद्योगिक वसाहत, मिहानसारखा प्रकल्प या परिसरात आहे. दोन राष्ट्रीय महामार्ग येथून जातात. भविष्यात या शहराचे महत्त्व आणखी वाढणार आहे, हे ध्यानात घेऊन झोनचा दर्जा गरजेचा असल्याचे शुक्ला यांनी म्हटले आहे. आजघडीस भारतीय रेल्वेत १७ झोन आहेत. मुंबई झोन देशात सर्वात मोठा आहे. सुरक्षेच्यादृष्टीने ते चुकीचे आहे. त्यामुळे त्याचे विभाजन करून नागपूर झोन निर्माण करता येऊ शकतो. नागपूर, भुसावळ आणि सोलापूर ही तीन मंडळे एकत्र करून नागपूर झोनची निर्मिती होऊ शकते. अमरावतीला मंडळ केल्यास नागपूर, अमरावती व भुसावळ मिळूनही हा झोन होऊ शकतो ​किंवा मध्य रेल्वेचे नागपूर व भुसावळ मंडळ तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे नांदेड मंडळ मिळूनही नव्या झोनची निर्मिती करता येऊ शकते. झोनचा दर्जा देण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा नागपुरात उपलब्ध आहेत. रिझर्व्ह बँक, डिफेन्स, वायुसेना मेन्टेनन्स, आंतरराष्ट्रीय विमानतळ, पॉवर स्टेशन्स, मेडिकल, मेयो ही सरकारी इस्पितळे आहेत. त्याचप्रमाणे मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या दोहोंचेही मंडळ मुख्यालय याच शहरात आहे. रेल्वे रिपेअर कोच वर्कशॉप, रेल्वे हॉस्पिटल, लोको रिपेअर, वर्कशॉप, विधान भवन, उच्च न्यायालय हे सारेच या शहरात आहे. त्यामुळे झोन दर्जासाठी नागपूरचा प्राधान्याने विचार व्हावा, असे शुक्ला यांनी म्हटले आहे.