30.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home Featured News मोजक्या वैष्णवांच्या उपस्थितीत तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

मोजक्या वैष्णवांच्या उपस्थितीत तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

0
170

पुणे(देहू)ः- जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या 335 व्या पालखीने प्रस्थान शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास विठुरायाच्या भेटीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे ठेवले. कोरोनाच्या संकटामुळे यंदा प्रथमच मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत शासकीय नियमांचे पालन करून तुकोबांच्या पालखीने  प्रस्थान ठेवले. शासनाने 50 वारकऱ्यांच्या समवेत आषाढी पायी वारीसाठी पालखी प्रस्थान सोहळ्याला परवानगी दिली असली तरी वारकरी आणि भाविकांमधील उत्साह कायम असल्याचे देहूनगरीत पाहायला मिळाले.पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त प्रथेनुसार पहाटे चार वाजता काकडा आरती आणि साडेचार वाजता शिळामंदिराची महापूजा संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, विश्वस्त अजित महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली.पहाटे पाच वाजता विठ्ठल रुख्मिणी मंदिरात संस्थानच्या अध्यक्षांसह विश्वस्त विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, संजय महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. तर पहाटे साडे पाच वाजता वैंकुठगमणे मंदिरात विश्वस्तांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.सहा वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराजांच्या समाधिची महापूजा संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्तांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.blank

सकाळी दहा वाजता पालखी प्रस्थान सोहळ्याच्या काल्याचे किर्तन प्रितम महाराज मोरे देहूकर यांनी ;तुझीया संगती | झाली आमुची निश्चिती ||; या अभंगाचे निरुपन करीत काल्याच्या किर्तनाने अखंड हरिणाम सोहळ्याची सांगता झाली.तत्पूर्वी सकाळी नऊच्या सुमारास सेवेकरी माऊली मसलेकर यांनी येथील घोडेकर सराफ यांनी चकाकी दिलेल्या श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका मंदिराच्या शेजघरातून मुख्यमंदिरात आणल्या.या पादुका काल्याचे किर्तन झाल्यानंतर पालखीचे सेवेकरी माऊली मसलेकरांनी डोक्यावर घेऊन उपस्थित वारकऱ्यांसह टाळ मृदंगाच्या तालवर भक्तीमय वातावरणात मंदिराला प्रदिक्षिणा घालत भजनी मंडपात प्रस्थानासाठी आणल्या.हा सोहळा मानाच्या दिंड्या, फडकरी व विणेकरी यांच्या शिवाय उपस्थित भाविकांसह सोहळा पार पडला.भजनी मंडपात दुपारी 2.30 वाजता प्रस्थान सोहळ्याला सुरवात झाली. ग्रामोपाध्याय नारायण अत्रे यांनी धरती, वायू, अग्नी, जल, आकाश यांच्यासह विधीवत पाद्य व कलशपूजा केली. प्रथम श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांची विधीवत पूजा करण्यात आली.त्यानंतर श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची महापूजा संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके व त्यांच्या पत्नी सारिका शेळके, प्रांताधिकारी सचिन बारवकर, तहसिलदार गीता गायकवाड, विक्रम महाराज माळवे यांच्यासह पासधारक वारकरी उपस्थित होते. पादुकांची विधीवत पूजा व आरती झाल्यानंतर उपस्थितांच्या हस्ते पादुका पालखीत ठेवण्यात आल्या.पालखी सोहळ्याचे प्रमुख चोपदार नामदेव गिराम यांच्यासह उपस्थित सेवेकऱ्यांना संस्थानच्या वतीने नारळ प्रसादाने सन्मानीत करण्यात आले.प्रथेप्रमाणे श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका उपस्थितांच्या हस्ते फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या.महाराजांच्या पादुका पालखीत ठेवल्यानंतर सेवेकरी भोई तानाजी कळमकर, गुंडाप्पा कांबळे, नामदेव भिंगारदिवे, अनिल गायकवाड, नामदेव पवार यांच्यासह भाविकांनीही पालखीला खांदा दिला. तुतारी (शिंगाडा) धारक पोपट तांबे यांनी तुतारी फुंकली.उपस्थित वारकऱ्यांनी;ज्ञानेश्वर माऊली तुकाराम; असा जयघोष करण्यास सुरवात केला. या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला.याच वेळी चौघडाही वाजविण्यात आला. पालखी भजनी मंडपातून बाहेर येताच सोहळ्यात सहभागी असलेल्या वारकऱ्यांमध्ये अधिकच उत्साह संचारला. त्यांच्या मुखातून आपोआपच अभंगाचे बोल बाहेर पडू लागले.