25 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home Featured News ‘कृषि ज्ञानपीठिका’मुळे कृषि विभागाशी संबंधित योजना, उपक्रमांची मिळणार एकत्रित माहिती

‘कृषि ज्ञानपीठिका’मुळे कृषि विभागाशी संबंधित योजना, उपक्रमांची मिळणार एकत्रित माहिती

क्षेत्रीय स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी कृषि विभागाचा उपक्रम शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, अचूक सल्ला देण्यासाठी होणार मदत

0
162

वाशिम जिल्ह्याचे अर्थकारण हे मुख्यतः शेतीवरच अवलंबून आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीमधून मिळणारे उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतीमधील उत्पन्न वाढविण्यासाठी कृषि विभागाने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण, मार्गदर्शन करण्यावर भर दिला जात असून शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी बांधावरच सोडविल्या जाव्यात, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याकरिता कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री शंभूराज देसाई व जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभागाने ‘कृषि ज्ञानपीठिका २०२०’ ही माहितीपुस्तिका तयार केला आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कृषि विषयक सर्व योजना, तसेच ग्रामस्तरावर काम करीत असताना संबंधित कर्मचाऱ्यांना निश्चित मार्गदर्शक ठरणार आहे.

शासन आणि ग्रामीण भागातील शेतकरी, शेतकरी गट यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून कृषि सहाय्यक काम करतो. शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, त्यांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्याची जबाबदारी मुख्यत्वे कृषि सहाय्यकावर असते. त्यामुळे कृषि सहाय्यकांना सर्व शासकीय योजनांची माहिती असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांना बियाणे, खते व कीटकनाशके यांच्या वापराविषयी मार्गदर्शन करणे, शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापराबाबत माहिती देण्याचे काम कृषि सहाय्यकांच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे प्रत्येक कृषि सहाय्यकला या सर्व बाबींचे ज्ञान असणे आवश्यक असते. त्यामुळे कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आवश्यक असलेली माहिती एकत्रित स्वरुपात नेहमी त्याच्या सोबत असावी, या हेतून ‘कृषि ज्ञानपीठिका २०२०’ ही कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयीचा माहितीपूर्ण पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ग्रामस्तरावरील कृषि सहाय्यक ते जिल्हा स्तरावरील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांची कर्तव्य व जबाबदाऱ्या, त्यांनी करावयाची कामे, त्यांचे अधिकार याबाबतची एकत्रित माहिती ‘कृषि ज्ञानपीठिका २०२०’ आहे. तसेच पिक पाहणी, पिकांचे अंदाज व उत्पन्न काढण्यासाठीचे पिक कापणी प्रयोगापासून ते जलसंधारणाच्या स्त्रोतांची निर्मिती व दुरुस्ती, पाण्याचा संरक्षित सिंचनासाठी वापर आदी विविध पद्धतींची माहिती देण्यात आली आहे. कृषि कर्मचाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर करावयाच्या कामांचे महिनानिहाय वेळापत्रक सुद्धा यामध्ये देण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यातील प्रमुख पिकांच्या उत्पादका वाढीसाठी राबवायच्या उपाययोजांची माहिती सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे.

जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येत असलेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, कृषि यांत्रिकीकरण कार्यक्रम, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यासह कृषि विभागामार्फत अंमलबजावणी केल्या जात असलेल्यासर्व योजनांची विस्तृत माहिती ‘कृषि ज्ञानपीठिका २०२०’ देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला शेतीशी निगडीत योजना, पिक कापणी प्रयोगासारखी कामे याविषयीची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे क्षेत्रीय स्तरावरील कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे, तसेच शेतीचे तंत्र, यांत्रीकीकरण, सिंचन आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी ही पुस्तिका उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे क्षेत्रीय स्तरावरील स्तरावरील कृषि अधिकारी, कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

कृषि सहाय्यक हा कृषि विभाग व शेतकरी यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. कृषि सहाय्यक हा शेती ज्ञानामध्ये पारंगत असल्याशिवाय शेतकऱ्यांना शेतीविषयक कामात योग्य मार्गदर्शन तसेच शासकीय योजनांच्या लाभाविषयी माहिती देवू शकत नाही. शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून शेतीतील उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्यामध्ये कृषि सहाय्यकाची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे कृषि सहाय्यक तसेच कृषि विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कृषि विभागाच्या विविध योजना, शेतीचे तंत्र यासह आवश्यक माहिती एकत्रित उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ‘कृषि ज्ञानपीठिका २०२०’ या माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, वाशिम