भंडारा – नवीन नागझिरा आणि कऱ्हांडला अभयारण्यातील वन्यप्राण्यांची संख्या वाढत असतानाच या अभयारण्यांच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. 150 पेक्षा अधिक गावांत वन्यप्राण्यांचा शिरकाव होऊन संघर्ष होण्याची भीती आहे. मात्र, यातील 150 पेक्षा अधिक गावांचे पुनर्वसन अद्याप अधांतरीच आहे.
जिल्ह्यातील नवीन नागझिरा आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात पवनी, मोहाडी, भंडारा, लाखनी व साकोली तालुक्यातील गावांचा समावेश झाला. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे व्यथित झालेले येथील शेतकऱ्यांना आता वन्यप्राण्यांचाही सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्नासाठी साखर कारखाना सुरू झाल्यापासून उसपीक घेणे सुरू केले. त्यामुळे गावांच्या शिवारात रानडुकरे व तृणभक्षक प्राण्यांना आसराच मिळाला. त्यामुळे प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना रानडुकरांमुळे पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी आहेत.
विद्युत भारनियमनामुळे रात्रीबेरात्री शेतात पिकाला पाणी देण्यास जाणाऱ्या शेतकऱ्यांना वन्यपशूंच्या हल्ल्यांची भीती निर्माण झाली आहे. नवीन अभयारण्यांमुळे 150 पेक्षा अधिक गावांचा जंगलात समावेश झाला. त्यामुळे या गावातील नागरिकांना वनोपजावर आधारित व्यवसाय बंद पडला. शिवाय, स्वत:च्या शेतातील पिकाची चिंता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात साकोली तालुक्यात बिबट्याने गावात येऊन वृद्ध महिलेचा बळी घेतला. तसेच पवनी तालुक्यात दोन गावकऱ्यांना जखमी केले. यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.