आता उपस्थिती भत्ता २०० रूपये

0
12

गोंदिया-ग्रामपंचायतीच्या सदस्यांना ग्रामसभेचा उपस्थिती भत्ता २५ रूपये देय होता़ अत्यल्प भत्ता मिळत असल्यामुळे कित्येक ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेला उपस्थित राहण्यासाठी टाळाटाळ करीत होते. ग्रामसभेच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाने विकासात्मक धोरणातून भत्ता वाढ करण्याचे ठरविले होते. आता राज्य शासनाने ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत भत्त्यात सरसकट आठपट वाढ केली आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंचाच्या मानधनात देखील शासनाने लोकसंख्येच्या आधारावर वाढ केली आहे़

सध्या शहरीकरण वाढत चालले आहे़ कित्येक गावांची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढली आहे़ राज्यात एकूण २७९०६ ग्रामपंचायती आहेत़ मात्र वाढत्या शहरीकरणात देखील ५५ टक्के नागरिक अजूनही ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी पंंचायत राज व्यवस्थेतून प्रयत्न सुरू आहेत. पंचायतराज व्यवस्थेच्या योग्य मार्गदर्शकतत्त्वानुसार अनेक गाव स्वावलंबी झाली आहेत़ तरीही आदिवासी, अतिमागास क्षेत्रातील ग्रा. पं. सदस्य ग्रामविकासाच्या बाबतीत उदासीन आहेत़ कित्येक गावांत ग्रामसभा केवळ सोपस्कार झाले आहे़ यामुळे शासनाच्या विकासात्मक तत्वांना तडा जात आहे. ग्रामसभेतील उपस्थिती अत्यल्प असते. ग्रा. पं. चे सदस्य म्हणून निवडून आल्यावर देखील नाममात्र २५ रूपये उपस्थिती भत्ता मिळते, या सबबीमुळे सदस्य ग्रामसभेला अनुपस्थित राहतात. ग्रामविकासाकरिता सदस्यांना ग्रामसभेत उपस्थित राहिले पाहिजे यासाठी राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने सदस्यांच्या भत्त्यात भरघोष वाढ केली आहे़ सदस्यांना २५ रूपये भत्त्यावरून आठपट वाढ झाल्याने सरसकट २०० रूपये उपस्थिती भत्ता देय राहणार आहे. वर्षभरात होणाऱ्या १२ ग्रामसभांना २०० रूपये प्रमाणे भत्ता ग्रामपंंचायत सदस्यांना मिळणार आहे़ भत्त्याप्रमाणेच सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी कित्येक दिवसापासून होत होती़ मिळणारे मानधन हे त्या गावातील लोकसंख्येवर आधारीत राहणार आहे़ देय असलेल्या मानधनात शासन ७५ टक्के रक्कम देणार असून ग्रा. पं. ला २५ टक्के रक्कमेचा वाटा उचलावा लागणार आहे़