गायमुख पर्यटनस्थळाच्या विकासासंदर्भात आढावा बैठक

0
155

मुंबई, दि.६ : तळा तालुक्यातील पन्हेळी गावातील ‘गायमुख’ प्राचिन स्थळाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

पर्यटनाचा ‘क’ दर्जा असलेल्या या प्राचीन स्थळाच्या पर्यटन विकासासाठी अंदाजपत्रक सादर करताना जमिनीची मालकी, जागेचा आराखडा व तिथल्या सुविधा यांचे सविस्तर सादरीकरण करावे, अशा सूचना राज्यमंत्री कु. तटकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.पायाभूत सुविधा असल्यास येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत येणाऱ्या काळात निश्चित वाढ होईल असा विश्वास राज्यमंत्री कु. तटकरे यांनी व्यक्त केला.

बैठकीदरम्यान शिवथरघळ या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी इमारत बांधणी, पायऱ्यांची दुरुस्ती, स्थानिकांच्या निवेदनाप्रमाणे स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यासंदर्भात जिल्हा परिषदेशी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना राज्यमंत्री कु. तटकरे यांनी दिल्या.यावेळी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी श्री मेत्रे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विनय वावधने, पर्यटन संचालनायाचे सहायक संचालक श्री रवींद्र पवार उपस्थित होते.