पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील दुर्देवी घटना
पुणे:-शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या ४ शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रय वळसे पाटील कृषी फार्मच्या शेततळ्यात ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. या घटनेने निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार श्रद्धा काळू नवले (वय १३), सायली काळू नवले (वय ११), दीपक दत्ता मधे (वय ७) राधिका नितीन केदारी (वय १४) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. यामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. शाळेला सुट्टी असल्यामुळे ही चारही मुलं शेततळ्याजवळ खेळत होती. त्यानंतर दुपारच्या सुमारास ती पाण्यात उतरली होती, मात्र त्यांना पोहता येत नव्हतं त्यामुळे ती पाण्यात बुडाली.
मूळचे जवळे बाळेश्वर (संगमनेर) येथील कामगार गोरक्षनाथ बबन कवठे हे पत्नी ज्योती तसेच दत्तक मुली श्रद्धा काळू नवले व सायली काळू नवले यांच्यासमवेत निरगुडसर येथे राहून मजुरीचे काम करत होते. तर मूळचे कानेवाडी (ता. खेड) येथील तीन कुटुंबे कामासाठी निरगुडसर येथे आले आहे. सर्वजण पोंदेवाडी येथे शेतात काम करण्यासाठी गेले होते. त्यांची मुले घरीच होती. दुपारच्या सुमारास श्रद्धा नवले, सायली नवले, दीपक मधे, राधिका केदारी हे चौघे पोहण्यासाठी नजीक असलेल्या शेततळ्यात गेले. शेततळ्यात ५ ते ७ फूट पाणी होते. पोहत असतानाच चौघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला