जागतिक अंडी दिनीच शाळेतून अंडी हद्दपार

0
34

गोंदिया ,दि. १0- – शालेय विद्यार्थ्यांमध्ये असलेले कुपोषण कमी करण्यासाठी देशभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करावा, असा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. शिक्षण संचालनालयातर्फे परिपत्रक काढून सर्व संबंधितांना निर्देशही देण्यात आले होते.मात्र राज्यातील कोणत्याही शाळेत जागतिक अंडी दिनानिमित्त शालेय पोषण आहारात अंडी वाटप झालेच नाही.गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया,गोरेगाव व तिरोडा तालुक्यातील शाळांमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वक्षणातून ही माहिती समोर आली आहे.ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार जागतिक अंडी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अंड्यातील पोषणमूल्यांचे मानवी आहारातील महत्वाबाबत जनमानसात जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंडी परिषदेच्या मार्गदर्शनात सर्वत्र हा दिवस साजरा केला जातो.मध्यान्ह पोषण आहारामध्ये देशातील १४ राज्ये अंड्यांचा वापर करतात. तामिळनाडू व आंध्रप्रदेश यात सर्वात पुढे आहे.
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये असलेले कुपोषण कमी करण्यासाठी राज्यभरातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारातही आता अंड्यांचा समावेश केला जाणार आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त विश्वास भोसले यांनी या संदर्भात राज्याच्या शिक्षण विभागाचे आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांना यासंदर्भात पत्र पाठविले असून त्यात ही सूचना केली आहे.
राज्यातील शाळांमध्ये माध्यान्ह पोषण आहारात आठवड्यातून एकदा मुलांना पुरक आहार दिला जातो. केंद्र आणि राज्य शासनाच्या कुक्कुटपालन योजना पशुसंवर्धन विभाग राबवित असून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना ताजी अंडी मिळू शकतील, असेही या पत्रात म्हटले आहे.
राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाने याबाबतचे पत्र राज्यातील सर्व शिक्षणाधिका-यांना पाठविले आहे. तसेच पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्याच्या आणि ९ ऑक्टोबर हा दिवस जागतिक अंडी दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचनाही यात देण्यात आल्या होत्या.मात्र हे पत्र बहुतांश शाळांपर्यंत पोहचलेच नसल्याने राज्यातील कोणत्याही शाळेत जागतिक अंडी दिनानिमित्त शालेय पोषण आहारात अंडी वाटप झाले नसल्याचे काही मुख्याध्यापकांचे म्हणने आहे.