राज्यातील 400 डॉक्टर्सची पदे तातडीने भरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

0
5

मुंबई दि. १३: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभागातील 400 डॉक्टर्सची पदे तातडीने भरण्यात यावीत, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मंत्रालयात आरोग्य विभागाची आढावा बैठक झाली, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ग्रामीण भागात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी पुरेसे डॉक्टर आणि विशेषज्ज्ञ यांची तातडीने भरती होणे आवश्यक आहे. या पदांच्या भरतीसाठी कोणतेही बंधन नसून ही प्रक्रिया राबविताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिल्यास त्यांच्या विनापरवानगी गैरहजरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांचे मजबुतीकरण आणि आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी खासगी व सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर आरोग्य संस्थांमधून देण्यात येणाऱ्या सेवांचे बळकटीकरण करावे, तसेच याबाबतचा पहिला पथदर्शी प्रकल्प अमरावतीमध्ये राबविण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मेळघाटमधील हरीसाल गाव मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून ‘स्मार्ट व्हिलेज’ ची कार्यवाही सुरू आहे. येथील आरोग्य केंद्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान कार्यान्वित झाल्यास या भागात वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना, औषध खरेदीसाठी वैद्यकीय महामंडळ स्थापन करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रकल्प संचालक आय.ए.कुंदन यांनी सादरीकरण केले.