अर्थमंत्र्यांनी महाज्योतीला मंजूर केले 148 कोटी,अध्यक्ष व एमडी देणार काय लक्ष

0
42

गोंदिया,दि.06ः-महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती ही संस्था ओबीसी भटक्या व विशेष मागास प्रवर्ग या मधील विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धात्मक परीक्षांच्या व किमान कौशल्य प्रशिक्षणासाठी स्थापन झालेली आहे. यावर शासनाने सात शासकीय संचालक, तीन अशासकीय तज्ञ संचालक यांची नेमणुक केलेली आहे. परंतु महाज्योतीवर अध्यक्ष मात्र न नेमल्यामुळे, अध्यक्षपद इतर मागास विभागाचे मंत्री, विजय वडेट्टीवार यांनीच स्वताकडेच ठेवून घेतले.
महाज्योती या संस्थेवर एमडी म्हणुन गोंदियाचे तत्कालीन सीईओ प्रदिप डांगे यांचे कडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला होता. पण त्यांच्या नियोजनशुन्यतेचा आणि गैरकारभाराचा महाज्योतीमधील विद्यार्थी योजनांना फार मोठा फटका बसला. मागील आर्थिक वर्षात कोरोनामुळे आर्थिक तंगी असतांनाही, महाज्योतीला महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी १५५ कोटी रूपये महाज्योतीला मंजुर केले.आणि सुमारे ३५ कोटी रूपये, प्रत्यक्ष खात्यात जमा केले. शासकीय अर्थ खात्याच्या नियमानुसार मंजुर निधीपैकी, प्रत्यक्ष दिलेला निधी खर्च करून, त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र दिल्यावरच नविन निधी दिला जातो. आणि मंजुर निधी त्याच वर्षात खर्च करण्याचे बंधन असते.अन्यथा आर्थिक वर्ष संपल्यावर तो निधी लॅप्स होतो.असे असतांना महाज्योतीचे एम डी असलेले प्रदिप डांगे यांच्या बेपर्वावृत्तीमुळे, विद्यार्थ्यांसाठी विविध योजना न करणे, पाच सहा महिणे संचालक मंडळाची मिटींगच न बोलावणे, स्वता गोंदियाला राहुन, ओबीसी विरोधी सेवानिवृत्त कंत्राटी अधिकार्‍याच्या हाती महाज्योतीचा कारभार देणे,केवळ निविदा,कंत्राटे आणि खरेदीमधेच मग्न राहणे, यामुळे, महाज्योतीला मंजुर झालेला १५५ कोटी रूपयाचा निधी पैकी मागील आर्थिक वर्षात केवळ साडेतीन कोटी रूपये या बहाद्दर एमडी यांनी खर्च केले. महाज्योतीच्या खात्यात ३५ कोटी रूपये असतांना, व पुन्हा १२५ कोटी मिळण्याची खात्री असतांनाही, डांगे यांच्या मनमानी व नियोजनशुन्य कारभारामुळे, महाज्योतीचा १२५ कोटी रूपयाचा निधी हा लॅप्स झाला. एकीकडे अशाच प्रकारची असलेल्या सारथी संस्थेत एवढ्याच निधीचा पुरेपुर उपयोग करून, मराठा विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी आर्थिक दिलासा मिळत होता,तर दुसरीकडे ओबीसी विद्यार्थी निट सीईटी एमपीएससी युपीएससी व पीएचडी संशोधक प्रशिक्षण व आर्थिक मदतीसाठी महाज्योती ला साकडे घालुन, एमडी व मंत्री अध्यक्ष यांना विनवणी करत होते. पण कर्तव्यशुन्य एम डी प्रदिप डांगे आणि अध्यक्ष असलेले मंत्री यांना त्यांच्या विशिष्ठ कार्यव्यस्ततेमुळे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वेळच नव्हता. शेवटी ओबीसी विद्यार्थी मदतीसाठी टाहो फोडीत राहीले. व प्रदिप डांगे व त्याचे कंत्राटी अधिकारी किरीट देशपांडे ओबीसी विद्यार्थ्यांच्या आगतिकतेवर हसत राहीले. महाज्योतीचे ३५ कोटी रक्कम खात्यात असतांना व १२५ कोटी परत गेले, तरी विद्यार्थ्यांना मदत नाकारणारे, प्रदिप डांगे एम डी हे जेवढे जबाबदार होते,तेवढेच मंत्री असतांना, केवळ प्रतिष्ठा आणि मोहापायी, महाज्योतीवर स्वतंत्र अध्यक्ष नेमण्याची तरतुद असतांनाही, अध्यक्षपद घेवून बसणारे,पण ओबीसी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून, एमडी प्रदिप डांगे यांची पाठराखण करणारे, मंत्री विजय वडेट्टीवार सुध्दा तेवढेच जबाबदार आहेत.
अशा बेजबाबदार असलेल्या एम डी डांगे याची महाज्योतीच्या संचालक मंडळावरून, तत्काळ हकालपट्टी करावी, व ओबीसी असलेल्या ओबीसी हिताच्या अधिकार्‍याची पुर्णवेळ एम डी म्हणुन नेमणुक करावी, अशी गेल्या जानेवारीपासुन ओबीसी विद्यार्थी व संघटनांनी मागणी केली होती. त्यातच गोंदियाचे सीईओ असलेले हे प्रदिप डांगे यांची, त्यांच्या अशाच गैरकारभार,भ्रष्टाचार आणि विविध गंभीर कारणाच्या तक्रारी जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी यांनी केल्यामुळे ,प्रदिप डागे यांची २६ आॅगस्टला तडकाफडकी बदली करण्यात आली. आता हे महाज्योतीमधुनही निघुन जाणार हे निश्र्चित असतांना, महाज्योतीत डांगे नकोच ही भुमिका महाज्योतीच्या बहुसंख्य संचालकांची असतांना सुध्दा, मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, तीन आघाडीच्या सरकारला तंबी देवुन, माझ्या मंत्री विभागातील महाज्योतीमधे ढवळाढवळ करू नका अशी भुमिका घेवून, भ्रष्टाचार, गैरकारभार व ईतर गंभीर आरोपावरून, शासनाने गोंदियावरून हाकललेल्या पुन्हा प्रदिप डांगे यांनाच आता अत्यंत संवेदनशिल व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या , महाज्योतीचे पुर्ण वेळ एम डी म्हणुन १ सप्टेंबरला आदेश काढुन बसवले. याचा विविध ओबीसी संघटना, विद्यार्थी यांनी निषेध केला असुन, अशा भ्रष्ट व गंभीर तक्रारी असलेल्या अधिकार्‍यालाच पुन्हा महाज्योतीवर बसविण्याच्या भुमिकेवर प्रश्र्नचीन्ह निर्माण झाले आहे.
मागील वर्षाचा निधी खर्चाअभावी परत गेल्यामुळे, आता नविन योजनांसाठी निधी लागेल, म्हणुन महाज्योतीचे संचालक प्रा.दिवाकर गमे व लक्ष्मण वडले यांनी छगनराव भुजबळ व अर्थमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेवून निधीची मागणी केली. त्यावेळी अर्थमत्री अजितदादा पवार यांनी महाज्योतीला ओबीसी भटक्या जातीजमातीच्या विद्यार्थी विकास योजनांसाठी निधीची कमतरता भासु देणार नाही, असे आश्र्वासन दिले. व त्याचा भाग म्हणुन महाज्योतीला सन २०२१— २२ या आर्थिक वर्षासाठी १४८ कोटी रूपयाच्या वेतनेत्तर अनुदानाला मंजुरी दिली.व त्यापैकी १५ कोटी रूपये योजनांसाठी प्रत्यक्ष महाज्योतीच्या खात्यातही जमा केले.
अशा प्रकारे महाराष्ट्र शासनव अर्थमंत्री महाज्योतीवर उदार हस्ते निधी देत असतांना, मागील वर्षी महाज्योतीकडे ३५ कोटीचा निधी खात्यात असतांना व १२५ कोटी रूपये मिळण्याची खात्री असतांनाही, ओबीसी विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी तडफडत ठेवुन, शासनाला १२५ कोटी परत पाठविणारे महाज्योतीचे अध्यक्ष व मंत्री विजय वडेट्टीवार, आणि नियोजन शुन्यता, ओबीसी विरोधी धोरणे, गैरकारभारावर शिक्कामोर्तब होवूनही, मंत्र्याच्या पाठींब्याने, महाज्योतीचे एम डी पद हडपणारे एम डी डांगे, आता तरी ओबीसी विद्यार्थ्यांच्या योजना राबविणार,की पुन्हा केवळ कंत्राटे, मलिदा ढापणार्‍या विविध महाज्योतीच्या खरेद्या, यातच गुंग राहणार,हे काळच ठरवणार आहेत.