शेतकरी, वंचित, कष्टकऱ्यांसाठीचे भाऊसाहेबांचे कार्य अतुलनीय – ज्येष्ठ नेते शरद पवार

0
27

अमरावती, दि १० : शेतकरी, कष्टकरी, वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य केले. दलित, आदिवासी वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व कृषी शाखांत उच्च शिक्षण घेता यावे यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेने भाऊसाहेबांच्या नावे शिष्यवृत्ती योजना सुरू करावी, अशी सूचना करतानाच, ज्येष्ठ नेते संसद सदस्य शरद पवार यांनी या शिष्यवृत्ती योजनेसाठी आपल्या संस्थेतर्फे एक कोटी रूपये देणगी देत असल्याची घोषणा आज केली.

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय परिसरात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षागृहाचे उदघाटन व स्व. रावसाहेब इंगोले स्मृती प्रवेशद्वाराचे लोकार्पण, तसेच ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृत: वैदिक धर्ममीमांसा’ या ग्रंथाचे प्रकाशन श्री. पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर, क्रीडा मंत्री सुनील केदार,  खासदार नवनीत राणा, आमदार सुलभाताई खोडके, आमदार किरण सरनाईक, आमदार अमोल मिटकरी, प्रकाश गजभिये, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, संस्थेचे सर्व सदस्य आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले की, भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांची शेती क्षेत्राविषयीची दृष्टी व्यापक होती. जागतिक शेतीक्षेत्राचे त्यांना भान होते. जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान, प्रयोग यांची भारतातील शेतक-यांना माहिती मिळावी, यासाठी त्यांनी भव्य जागतिक प्रदर्शन दिल्लीत भरवले. जगातील अनेक महत्वाच्या देशांच्या प्रमुखांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली.  भाऊसाहेबांना महात्मा जोतिबा फुले यांच्या विचार व कार्याबद्दल आस्था होती. घटना समितीतील त्यांच्या महत्वाच्या सूचना व योगदानाचा उल्लेख स्वत: संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात केला होता. अमरावती ही भूमी चांगल्या विचारांना सतत प्रोत्साहन देते. अमरावतीचे मानस घडविण्यात भाऊसाहेबांचा मोठा वाटा आहे.

भाऊसाहेबांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करून श्री. पवार म्हणाले की, भाऊसाहेबांच्या नावे गरीब वर्गातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेने शिष्यवृत्ती योजना सुरू करावी. या योजनेसाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रूपये मदतीची घोषणा त्यांनी केली.

बहुजन समाज शिकला पाहिजे या भूमिकेतून भाऊसाहेबांनी मोठे कार्य केले. संस्थेच्या कार्यासाठी शासन-प्रशासनाकडून सातत्याने सहकार्य केले जाते व यापुढेही संस्थेच्या अनेकविध उपक्रमांना आवश्यक ते सर्व सहकार्य करू. कोविडकाळातही संस्थेच्या सहकार्याने अनेक उपक्रमांना चालना मिळाली, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.  खासदार  श्रीमती राणा यांनीही मनोगत व्यक्त केले.

बाहेरून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना निवासी सुविधा म्हणून धर्मशाळा निर्माण होणे आवश्यक आहे, असे आमदार श्रीमती खोडके यांनी सांगितले. गोरगरीब घटकांना विचार करून भाऊसाहेबानी आदर्श शिक्षण व्यवस्था उभी केली. या कार्याला पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. ज्येष्ठ नेते श्री. पवार यांचे त्यासाठी सातत्याने सहकार्य मिळते, असे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. देशमुख यांनी सांगितले.

‘डॉ. पंजाबराव देशमुख कृत: वैदिक धर्ममीमांसा’ या ग्रंथाचे संपादक सुधीर भोंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले.