नाविण्यपूर्ण उपक्रम, योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री कु.आदिती तटकरे

0
17

अलिबाग, दि.01 : जिल्ह्यातील नागरिकांना माझी वसुंधरा, गरूडझेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व कातकरी उत्थान अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय सेवा तत्परतेने देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशाच प्रकारे नाविण्यपूर्ण उपक्रम, योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.

अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे 01 मे, महाराष्ट्र दिनाच्या 62व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उप वनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज.द.मेहत्रे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अमित सानप, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, तहसिलदार श्रीमती मिनल दळवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, उप मुख्य लेखा व‍ वित्त कार्यकारी अधिकारी विकासी खोळपे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या, व्यवस्थापक श्यामकांत चकोर, तहसिलदार सचिन शेजाळ, विशाल दौंडकर, सतिश कदम, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे जिल्हा समन्वयक रत्नशेखर गजभिये, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड.भूषण साळवी, निवृत्त ॲडमिरल एल. रामदास हे सपत्नीक तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, आपला रायगड जिल्हा हा वार्षिक नियोजन विकास निधीचे संपूर्ण विनियोजन करण्यात राज्यात अव्वल स्थानी आहे. प्रत्येक समाज घटकांचा सर्वकष विचार व विकास साधण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. जगभरात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती” योजनेच्या निकषांत सुलभता व सहजता आणून विद्यार्थ्यांना 100 टक्के लाभ देण्यात यश मिळाले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्यातून पोस्ट व प्रि-मॅट्रीक स्कॉलरशिप, स्वाधार, रमाई आवास, वसतिगृहे व निवासी शाळा, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास व बार्टीमार्फत जिल्हावासीयांना सहाय्य उत्तमरित्या होत आहे.

अलिबाग तालुक्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाबाबत त्या म्हणाल्या की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचा भूमीपूजन सोहळा अलिकडेच दूरदृश्यप्रणालीद्वारे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते आणि आदरणीय खासदार शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला असून रायगडकरांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची व भविष्यातील डॉक्टर होऊ पाहणाऱ्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांची पहिली तुकडी नुकतीच सुरू झाली आहे, या विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. याशिवाय जिल्ह्यातील दळणवळणासाठी सार्वजनिक बांधकामांतून अलिबाग-रोहा रस्ता, पोयनाड नागोठणे रस्ता, पाली-पाटणूस व मुरूड-रोहा-कोलाड-पुणे आदी कामे प्रगतीपथावर आहेत.

आरोग्य संपन्न रायगड जिल्हा करण्यासाठी शासकीय वैद्यकीय यंत्रणांमध्ये अद्ययावतीकरण व बळकटीकरण या माध्यमातून जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे-उपकेंद्रे, जिल्हा-उपजिल्हा रुग्णालये, मानगांव ट्रॉमा केअर सेंटर्स, भुवनेश्वर रोहा येथील स्त्री व नवजात बाल रुग्णालय बांधणीसाठी आवश्यक त्या विकासप्रकीया प्राधान्याने पार पडत आहे.

आरोग्य विभाग, जिल्हा रायगड परिषद मार्फत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यासाठी एकूण 59 हजार 152 चे उद्दिष्ट असून माहे मार्च 2022 अखेर 55 हजार 373 लाभार्थी मातांची नोंदणी करण्यात आली आहे. एकूण उद्दिष्टांच्या 94 टक्के काम झाले आहे. तसेच जननी सुरक्षा योजनेंतर्गत एकूण 5 हजार 697 लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून माहे मार्च 2022 अखेर एकूण 2 हजार 598 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्यात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून अद्याप लसीकरण न झालेल्यांना या निमित्ताने लसीकरणासाठी पुढे यावे, असे जनतेला आवाहन करीत त्या पुढे म्हणाल्या, शासनाच्या सूचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्व-उत्पन्नाचा 5 टक्के निधी दिव्यांग व्यक्तींसाठी नाविणपूर्ण योजनेमार्फत राबविण्यासाठी प्रशासनास सूचना दिल्या आहेत. गडकिल्ले, अभयारण्य, निथळ समुद्रकिनारे हे आपले वैभव जपण्यासाठी व येथील सौंदर्यामध्ये अधिक भर टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रादेशिक पर्यटन विकास योजनेमार्फत साधण्यात मोठे यश मिळाले आहे. समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे, महत्त्वाची धार्मिक स्थळांवरील पायाभूत सोई-सुविधा व सौंदर्यीकरणाच्या कामांसाठी सुमारे 40 कोटींहून अधिक निधी विकासकामांसाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून वितरीत करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील थोर स्वातंत्रसेनानी-क्रांतिकारकांची स्मारके व वीरभूमीचे ऐतिहासिक महत्त्व सांगणाऱ्या  वास्तूंच्या विकासाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्याची ही पंचाहत्तरी हा सूवर्णकाळ ज्यांच्यामुळे आपण अनुभवत आहोत, असे थोर स्वातंत्रसेनानी-क्रांतिकारकांची स्मारके व वीरभूमीचे ऐतिहासिक महत्त्व सांगणाऱ्या  वास्तूंचे जतन, संवर्धन व सौंदर्यीकरणाची कामे प्राधान्याने करण्यात येत आहेत. ज्यामध्ये सरदार तानाजी मालुसरे स्मारक-उमरठ, शिवतीर्थ समरभूमी-उंबरखिंड-खालापूर, विरमाता जिजामाता समाधी-पाचाड, महाड, शहीद निलेश तुणतुणे स्मारक-अलिबाग, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्मारक-पनवेल, भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक-महाड, हुतात्मा हिराजी पाटील स्मारक-कर्जत, अलिबाग चरी येथील शेतकरी स्मारक,  व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते कॅप्टन यशवंतराव घाडगे स्मारक-माणगाव, उरणचा चिरनेर सत्याग्रह, शेषनाथ वाडेकर स्मारक-अलिबाग, आचार्य विनोबा भावे यांचे गागोदे येथील स्मारक, सरखेल कान्होजी आंग्रे स्मारक-अलिबाग, हुतात्मा स्मारक-पेण आदींचा समावेश आहे.

प्राकृतिक सौंदर्यासह ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा असलेला आपला जिल्हा, येथील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना पर्यटकांना, अभ्यासकांना कायम आकर्षित करतात. जिल्ह्याचा 50 टक्के भाग हा ग्रामीण भाग असून शेतीवर आधारित ग्रामीण पर्यटनस्थळांचा विकास व त्यातून थेट रोजगारनिर्मितीच्या विचारातून येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यातील विविध लोकप्रिय ठिकाणाकडे लक्ष वेधणारी कार्ये घडत आहेत. जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासकामांसाठी तब्बल रुपये 45 कोटी 80 लाख 56 हजार इतक्या निधीस प्रशासकीय मान्यता व त्यापैकी पहिल्या टप्प्यातील रुपये 19 कोटी 55 लाख 99 हजार इतका निधी वितरणासाठी मान्यता मिळविण्यात यश आले आहे, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, मुरूड, श्रीवर्धन, अलिबाग या ब-वर्ग पर्यटन स्थळांना सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे, अष्टविनायक परिमंडळाचा सर्वांगीण विकास आदी माध्यमातून जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यात वास्तव्य करण्यास व हे जिल्ह्यातील वैभव अनुभवण्यासाठी प्रेरित करुन रोजगार उपलब्ध करण्याचा मानस आहे. डॉ.सलीम अली पक्षी अभ्यास व संशोधन केंद्राचे भूमीपूजन झाले आहे. भविष्यात भावी पिढीला रायगड जिल्ह्यात पक्षी अभ्यास व संशोधन केंद्र उपलब्ध होणार आहे.

रेवस-रेड्डी सागरी मार्ग होत असताना त्याला जोडून असलेले रस्ते-खाडीपूल यांचादेखील त्यात समावेश व्हावा, अशी विनंती रायगड जिल्ह्याची पालकमंत्री या नात्याने मी शासनाला केली होती असे स्पष्ट करून पालकमंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, समुद्रसफारीचा आनंद देणाऱ्या या महामार्गाचा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये सहभाग भविष्यात नक्कीच असणार आहे. वातावरणीय बदल, चक्रीवादळे होणे, दरड कोसळणे, अतिवृष्टीमुळे होणारी पूरपरिस्थिती, भूस्खलन आदी दुर्देवी घटनांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी जिल्ह्यात कायमस्वरूपी एनडीआरएफ पथक उभारणीसाठी बेसकॅम्प लवकरच उभारला जाईल. अशा परिस्थितींमध्ये कार्यान्वित असणाऱ्या महसूल व आपत्ती व्यवस्थापनासाठी महसूल यंत्रणा, इमारतींचे बांधकाम व अद्ययावतीकरण या कामांना प्राधान्याने यशपथावर नेण्याचा माझा प्रयत्न आहे. महाड मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी जागा प्रदान होणे, हा त्यातीलच एक महत्त्वाचा टप्पा आहे.

आपल्या भाषणात पालकमंत्र्यांनी पहिली महिला मेट्रो पायलट रोह्याची गार्गी ठाकूर त्याचबरोबर नाविण्यपूर्ण कल्पनेतून वणवा विरोधी ड्रोन बनविणाऱ्या श्री.रतिश पाटील यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच जिल्ह्यात माझी वसुंधरा, कातकरी उत्थान अभियान, गरूडझेप स्पर्धा परिक्षा केंद्र असे उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविण्यात येत आहे, जिल्ह्यात पोलीस विभागाकडून कायदा व सुव्यवस्थाही उत्तम प्रकारे सांभाळली जात आहे, यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही अभिनंदन केले.

शेवटी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून कायम असेल. यासाठी आपल्या सर्वांचे  असेच सहकार्य लाभेल, अशी आशा व्यक्त करून पालकमंत्री कु.तटकरे यांनी पुनःश्च एकदा सर्व जिल्हावासियांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री कु.तटकरे यांनी ध्वजारोहणानंतर संचलनासाठी उपस्थित विविध दलांचे खुल्या जीपमधून फिरून पाहणी केली. यावेळी पोलीस, होमगार्ड, वाहतूक पोलीस विभागातील जवानांनी उत्कृष्ट संचलन केले. तसेच पोलीस, आरोग्य, अग्निशमन दल, श्वान पथक, बॉम्बशोधक पथक, बिट मार्शल अशा विविध वाहनांनीही संचलनात भाग घेतला.

यावेळी श्री.अभिषेक जावकर या तरुण उद्योजकाने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माथेरान येथे पेट्रोलिंगसाठी मदत व्हावी, याकरिता दोन उत्कृष्ट घोडे प्रशासनाला सुपूर्द केले.

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते परिवर्तन कार्यपुस्तिकेच्या

दुसऱ्या अंकाचे प्रकाशन संपन्न

 

प्रयत्न परिवर्तनाचे…

बुद्धिमत्तेच्या गरुड झेपेचे..

कातकरी उत्थानाचे….

वसुंधरेच्या संवर्धनाचे….!

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने “जानेवारी ते एप्रिल 2022” या कालावधीत जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामकाजाची मांडणी “परिवर्तन” च्या दुसऱ्या अंकाद्वारे सर्वांसमोर करण्यात आली. या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

प्रशासन म्हणून जनतेच्या जीवनात खरा बदल घडवून आणण्यासाठी, अगदी शेवटच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलविण्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर 2021 महिन्यात रायगड जिल्हा प्रशासनातील सर्वांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून “परिवर्तन” घडवून आणण्याची खूणगाठ मनाशी बांधली होती.  त्यानुसार जिल्हा प्रशासन शेतकरी, कातकरी आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कातकरी उत्थान अभियानांतर्गत “सप्तसूत्री” उपक्रम, जिल्ह्यातील युवक-युवर्तीमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी जागरूकता वाढण्यासाठी “गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र” ही संकल्पना आणि निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी “माझी वसुंधरा” हे अभियान राबवित आहे. जिल्हा प्रशासन करीत असलेल्या कामांची सचित्र मांडणी “परिवर्तन” या अंकाद्वारे दर चार महिन्यांनी प्रकाशित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सप्टेंबर 2021 ते डिसेंबर 2021 या चार महिन्यात जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामाचा मागोवा घेणाऱ्या “परिवर्तन” कार्यपुस्तिकेच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन दि.26 जानेवारी 2022 रोजी पालकमंत्री कु.आदिती तटकरे व इतर अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले होते.

सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यात ‘माझी वसुंधरा”, “कातकरी उत्थान अभियान” आणि “गरुडझेप स्पर्धा परिक्षा केंद्र हे उपक्रम यशस्वीपणे राबविण्याचा जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या समारंभात महाराष्ट्र पोलिस दलात सेवेत सतत पाच वर्षे उत्तम काम केल्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पोलीस हवालदार अजय मोहिते, महिला पोलीस हवालदार नीलम नाईक, पोलीस नाईक प्रशांत घरत यांना देण्यात आले.

तसेच मे.मॅक ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, महाड, मे.फाति जनरल इक्विपमेंट्स् प्रायव्हेट लिमिटेड, महाड या लघु उद्योजकांना जिल्हा पुरस्कार देण्यात आला.

यावेळी जिल्हा क्रीडा पुरस्काराने गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (कुस्ती) राजाराम बाजीराव कुंभार, गुणवंत खेळाडू (पुरुष) (वॉटरपोलो) भूषण गणपत पाटील, गुणवंत खेळाडू (महिला) (कुस्ती) कु.नेहा चंद्रकांत पाटील, गुणवंत खेळाडू (दिव्यांग) (कयाकिंग/कनोईंग) देविदास महादेव पाटील, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (मैदानी) गजानन तुकाराम भोईर, गुणवंत खेळाडू (पुरुष) (कुस्ती) दिवेश दत्तात्रय पालांडे, गुणवंत खेळाडू (महिला) (कबड्डी) कु.तेजा महादेव सपकाळ, गुणवंत खेळाडू (दिव्यांग) (मैदानी) विशाल विश्वनाथ जगताप यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेल बाबत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माजी शासकीय अभियोक्ता तथा भरोसा सेलच्या सदस्या ॲड. नीला तुळपुळे, सखी सेंटर तथा भरोसा सेलच्या सदस्या ॲड.गीता म्हात्रे यांनाही पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे तृतीय वर्ष बी.एस.सी मायक्रोबायोलॉजी मध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनी व पी.एन.पी महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा दिलीप चेरफळे हिचा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते सुश्री जाकिया उमर कारभारी, महाड, सुश्री नजमा उमर कारभारी, महाड, सुश्री मेघना बाबूलाल वर्मा, पनवेल या तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र वाटप करण्यात आले.

यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलचे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत आयोजित महिला सबलीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री महोदयांच्या हस्ते संपन्न झाले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस विभागाच्या “महिला दिन विशेष” या पुस्तिकेचे अनावरण पालकमंत्री कु.तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतनीकरण झालेल्या नवीन जंजिरा सभागृहाचे उद्घाटनही संपन्न झाले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी चेऊलकर व अजित हरवडे यांनी केले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.