दाभोलकर, पानसरेंची हत्या करणा-या गोडसेंच्या वारसदार प्रवृत्तीचा निषेध – श्रीपाल सबनीस

0
14
ग्यानबा तुकाराम नगरी (पिंपरी चिंचवड) दि. १६ – नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे व कलबुर्गी यांची हत्या नथुराम गोडसेच्या वारसदारां प्रवृत्तींनी केली असून या ह्त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो असे ८९व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. प्रदीर्घ भाषण पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध करण्यात आल्याचेही ते म्हणाले, व त्यांनी छोटेखानी उत्स्फूर्त भाषण यावेळी केले.
सबनीस यांच्या ताज्या वक्तव्यांवर टीकेची झोड उठली होती, काही प्रसारमाध्यमांनीही त्यांना लक्ष्य केले होते. याचा संदर्भ देताना प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा खांब मानली जातात, परंतु हीच प्रसारमाध्यमे तिरडीची ताटी होतात की काय असं वाटावं अशी स्थिती असल्याचंही मत खेदानं व्यक्त केलं.
‘‘इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. मेंदू इंग्रजीचा असला तरी पाय मराठीचे असू द्या.’’हे विधान कुणा ऐऱ्यागैऱ्याचे नाही; किंवा व्यवसाय मार्गदर्शन करणाऱ्या कुणा तज्ज्ञाचेही नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनीच आपल्या मराठी बांधवांना दिलेला हा सल्ला आहे. वास्तविक इंग्रजीच्या महत्तेवर सबनिशी मोहोर उमटायचीच काय ती बाकी होती, अशातला भाग नाही. इंग्रजीच्या सर्वदूर प्रसाराची ऐतिहासिक कारणे आहेत. परंतु, अलीकडे मराठमोळ्या श्रोत्यांना, मराठीच्याच व्या1सपीठांवरून, मराठी भाषक मान्यवरच ‘इंग्रजी माहात्म्या’चे पाठ देत आहेत, ही गोष्ट थोडेसे थांबून विचार करण्यासारखी आहे, असे वाटते. हे एकाच व्यक्तीचे विक्षिप्तपणाचे उद्‌गार आहेत, असे म्हणून हा विषय सोडून देण्याचीही सोय नाही. याचे कारण हाच सूर वेगवेगळ्या ‘रागां’मध्ये पुन्हापुन्हा आळवला जातोय. ‘मातृभाषेत शिक्षण मिळाले पाहिजे,’ असे म्हणणाऱ्या आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना लबाड ठरविले जातेय. ‘मराठी शाळा बंद पडताहेत? मग काय करणार?,’ अशी एक वृत्ती तयार होत आहे. जणू काही इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यायचाच काय तो अवकाश, ‘करिअर’ घडलेच म्हणून समजा, असा घट्ट समज तयार होतोय. प्रत्यक्षात प्रचलित पद्धतीतून ‘भाषिक कुपोषणा’ची स्थिती निर्माण होत आहे. भाषा हे भावना व्यक्त करण्याचे साधन आहे. तेच कच्चे ठेवून आपण विद्यार्थ्यांची पंचाईत करतो आहोत. संकल्पनात्मक ज्ञानाचा पाया पक्का करण्यात मातृभाषेचे महत्त्व नाकारता येणार नाही; पण इंग्रजी माध्यमाच्या लाटेत त्याकडेही दुर्लक्ष होतेय.