मामा तलाव दुरुस्ती पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

0
9

गोंदिया,दि.१६ : जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावातील पाण्याची क्षमता वाढावी व त्यामाध्यमातून जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली यावे यसाठी सडक/अर्जुनी तालुक्यातील खैरी, माहुली येथील गोंदिया पाटबंधारे विभागाच्या अधिनस्त असलेल्या माजी मालगुजारी तलावांच्या विशेष दुरुस्ती व पुर्नस्थापना कामाचा शुभारंभ पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
पालकमंत्री यावेळी म्हणाले, जिल्ह्यात असलेले माजी मालगुजारी तलाव नादुरुस्त असल्यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाल्यामुळे सिंचनाचे क्षेत्र कमी झाले आहे. या तलावांच्या दुरुस्तीच्या कामामुळे शेतकऱ्यांची सिंचन क्षमता वाढून पिकाची उत्पादकता वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
कार्यकारी अभियंता नरेंद्र ढोरे यांनी सांगितले की, ९० लक्ष रुपये खर्चून खैरी येथील तलावातील गाळ काढण्यात येईल. कालव्यांची, गेट व पाटचाऱ्याची दुरुस्ती करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष महादेव कापगते, सचिव ॲड.प्रकाश परशुरामकर, माजी सरपंच माधवराव परशुरामकर, पोलीस पाटील भृंगराज परशुरामकर, उपविभागीय अभियंता ए.एच.डोंगरे, तहसिलदार परुळेकर, शाखा अभियंता व्ही.एम.श्रीवास्तव, सुभाष मेश्राम व परिसरातील ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरितक्रांती पाणी वापर संस्था खोडशिवनी-खैरी आणि पाटबंधारे विभाग गोंदिया यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार मनोहर परशुरामकर यांनी मानले.